मुंबई, 18 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला काही दिवस उलटून गेल्यानंतरही त्याचे चाहते या धक्क्यातून अजून बाहेर आले नाहीत. सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधीलच काही घटक कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कंगना राणौत आणि इतर काही कलाकारांनीही याबाबत आवाज उठवला आहे. तर सोशल मीडियावरही सुशांतचे चाहते या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पाटण्यातून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आलेला एक गुणवान अभिनेता आपण गमावला आहे. ही एक भीतीदायक गोष्ट आहे आणि भविष्यात कोणत्या नवख्या कलाकाराला अशा त्रासातून जावं लागू नये,' असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
In my personal capacity I think that a detailed enquiry should be done in #SushantSinghRajput suicide case.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 17, 2020
We have lost a upcoming talented actor who came from Patna to make place for himself in #Bollywood
The cartel story is scary and no newcomer should go thru such torture
'मी वैयक्तिकरित्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत असून या प्रकरणातील सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. सुशांत सिंह राजपूत याचे सिनेमे थांबवण्यात आले होते का? त्याचे सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती का? काही सिनेमांमधून त्याला बळजबरीने काढून टाकण्यात आलं होतं? अशा अनेक प्रश्नांमुळे या आत्महत्या प्रकरणात संशय निर्माण झाला आहे,' असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.
I m personally meeting home minister @AnilDeshmukhNCP and demanding a enquiry and the truth should b in public domain
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 17, 2020
We're his movies stopped ?
We're his movies banned?
Was he forcibly removed from certain movies ?
Many such questions are doing rounds and leading to suspicion
दरम्यान, याआधीही स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बॉलिवूडमधील वैमनस्याच्या अँगलनेही या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आगामी काळात खरंच याबाबत सखोल तपास होऊन काही सत्य बाहेर येतं का, हे पाहावं लागेल.
संकलन, संपादन - अक्षय शितोळे