सुशांत प्रकरणी आता भाजप अडचणीत येणार? गृहमंत्र्यांनी CBIकडे दिलं महत्त्वाचं निवेदन

सुशांत प्रकरणी आता भाजप अडचणीत येणार? गृहमंत्र्यांनी CBIकडे दिलं महत्त्वाचं निवेदन

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याप्रकरणी लक्ष घातलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणातील तपासाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर भाजपच्या भोवतीही संशयाचं धुकं निर्माण होताना दिसत आहे. कारण चित्रपट निर्माता आणि सुशांतचा मित्र संदीप सिंह याचे भाजपशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याप्रकरणी लक्ष घातलं आहे.

'संदीप सिंह यांचा बिजेपीशी काय संबंध आहे, ड्रग माफियांशी काय संबंध आहे... या संदर्भात निवेदन आलं आहे. ते निवेदन आम्ही सीबीआयकडे सोपवलं आहे. आज आणि काल मला अनेक निवेदने मिळाली आहेत,' असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 27 भाषेत चित्रपट करणार्‍या संदीप सिंह याचे भाजपशी काय संबंध आहेत, तसंच संदीप सिंहचे संबंध बॉलिवूड आणि फिल्म इंडस्ट्रीशी काय आहेत त्याची चौकशी करावी अशी ती निवेदने आहेत. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे मी ही निवेदने सीबीआयकडे पुढील कारवाईसाठी पाठवली. आपल्याला कल्पना आहे की भाजपचे अनेक नेत्यांचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे. त्यांचे पाच वर्ष सरकार होते, त्यावेळी त्यांनी याबाबतीत काय केलं हा पण एक मोठा प्रश्न आहे,' असं म्हणत याप्रकरणी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आला आहे.

कोण आहे संदीप सिंह?

सुशांतसिंह प्रकरणात संदीप सिंहवरही मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चॅटवरुन ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर भाजपकडून सरकारवर हल्लाबोल सुरु आहे. त्यात काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करुन, भाजपच्या अँगलवरुनही चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे.संदीप सिंहचं भाजप कनेक्शनही तपासावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या