आदित्य ठाकरेंवर आरोप करण्याबद्दल लवकरच 'स्फोट' होईल, संजय राऊतांचा इशारा

आदित्य ठाकरेंवर आरोप करण्याबद्दल लवकरच 'स्फोट' होईल, संजय राऊतांचा इशारा

'हे संपूर्ण कारस्थान जे मला दिसतंय. ते ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राविरुद्ध कोण कारस्थान करत आहे'

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार असा सामना रंगला आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर अनेक आरोप केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या आरोपांना जशास तसे उत्तर दिले आहे. 'आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे आपल्याला माहिती असून लवकरच स्फोट होईल', अशा इशारा राऊतांनी दिला.

न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना संजय राऊत यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे.

'सुशांतसिंह राजपूत संदर्भात राजकारण होत आहे. पडद्या मागे पटकथा लिहिली जात आहे हे  दळभद्री राजकारण आहे. बदनाम करण्याचा हा डाव आहे. पण लक्षात ठेवा. आदित्य ठाकरे यांच्या दिशेने ज्या आरोपांच्या फैरी झाडत आहे, चिखलफेक करत आहात, यात बदनाम महाराष्ट्राला करत आहात' अशी टीका राऊत यांनी केली.

तसंच, 'हे संपूर्ण कारस्थान जे मला दिसतंय. ते ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राविरुद्ध कोण कारस्थान करत आहे,  राजकारण कोण करत आहे, कोणत्या पद्धतीने करत आहे आणि कोणत्या थराला जाऊन करत आहे, याचा लवकरच स्फोट होईल आणि याचा खुलासा लवकरच होईल', असा इशाराही राऊतांनी दिला.

'हे बिहार विरुद्ध महाराष्ट्र असं काही लोकांनी उभं केले आहे. आता बिहारचे राज्यकर्ते बोलत आहे, केस सीबीआयकडे द्या, मी म्हणतो सीबीआय कशाला तो ट्रंम्प तुमचा मित्रच आहे ना. मग त्यांच्या CIA कडे द्या, पुतीन यांच्याकडे द्या, युनो मध्ये प्रश्न उठवा. बिहार विधानसभेमध्ये कशाला प्रश्न उठवता, हा मूर्खपणा सगळा चाललेला आहे' असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला आहे.

'मुंबई पोलीस हे सक्षम आहेत. मुंबई पोलिसांवर जगाचा विश्वास आहे. मी इतर राज्यांशी तुलना करणार नाही. महाराष्ट्राला इथलेच राजकीय नेते पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहे. महाराष्ट्राशी इतकी बेईमानी या आधी कुणी केली नव्हती.' असंही राऊत म्हणाले.

' आज विरोधी पक्ष कालपर्यंत राज्याचे राज्यकर्ते होतात. आपण शासनप्रमुख होतात. हीच यंत्रणा आहे, हेच पोलीस आहेत. मग सहा महिन्यांपूर्वी ते पारदर्शक होते कार्यक्षम होते आणि आता त्यांच्यामध्ये दोष दिसायला लागले. आणि महाराष्ट्राच्या पोलिसांपेक्षा बिहारचे पोलीस बरे असे इकडले, लोकं जेव्हा म्हणायला लागतात. तेव्हा या कारस्थानाची मूळं कुठल्या चिखलात रूतलेली आहेत हे स्पष्टं दिसत आहे.' असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

'अमृता फडणवीस यांनी ट्विट करून मुंबई पोलिसांबद्दल अविश्वास व्यक्त केला. हेच मुंबई पोलीस तुमच्या सेवेत आहेत. मुंबई पोलीस ही व्यक्ती नाही, ती एक संस्था आहे. त्या संस्थेचे अशा प्रकारे खच्चीकरण करणं हे बरोबर नाही' असं म्हणत अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

'मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कालच्या राज्यकर्त्यांनी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलणे. राजकारणामध्ये कोणीही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नसतो. प्रत्येकाला या यंत्रणेलाच जवळ करून राज्य आणि देश चालवायचा असतो. हे राजकारणात हयात घालवलेल्या लोकांनी विसरू नये' असा इशाराही राऊतांनी भाजपला दिला.

Published by: sachin Salve
First published: August 5, 2020, 2:49 PM IST

ताज्या बातम्या