मुंबई महापालिका: भाजपला सुप्रीम कोर्टाकडूनही झटका; तिथेही दावा फेटाळला

मुंबई महापालिका: भाजपला सुप्रीम कोर्टाकडूनही झटका; तिथेही दावा फेटाळला

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा भाजपचा दावा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. मुंबई पालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असून त्याआधी भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी: मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी झटणाऱ्या भाजपच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच हाती लागली आहे. युती तुटून आघाडीचं राजकारण सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला होता. शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणएकर यांनी तो अर्थातच फेटाळला होता. त्यावर भाजपने कोर्टात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयातही भाजपचा दावा टिकू शकलेला नाही.

मुंबई महानगरपालिका 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरूनही आम्हाला डावलून महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनमानी कारभार करत कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल असा आरोप भाजपने केला होता. त्यांनी याबाबत मुंबई हायकोर्टाने भाजप विरोधात निकाल दिला. त्यावर या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं. मात्र आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा भाजपची याचिका फेटाळून लावत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहील असा निकाल दिला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे भाजपचे नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हा मनमानी निर्णय असल्याचे सांगत त्या निर्णयाला रिट याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. या याचिकेवर कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले रवी राजा यांनी सुद्धा प्रतिवाद केला होता. हायकोर्टाने यावर ‘ केवळ आपलं मत बदलल आहे किंवा राजकीय समीकरण बदलली म्हणुन तीन वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय आता पुन्हा बदलु शकत नाही’ असं सांगत ही याचिका फेटाळून लावली होती. यावर या याचिकेला भाजपकडून सुप्रीम कोर्टात आह्वान देण्यात आलं होत. मात्र हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच ठेवत पुन्हा एकदा शिंदे यांचे अपिल फेटाळून लावले आहे.

भाजपचा दावा काय?

2017 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना 84 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यानंतर 83 नगरसेवकांसह भाजप दुसऱ्या तर 31 नगरसेवकांसह काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. मात्र त्यावेळी शिवसेना आणि भाजपची असलेली युती पाहता भाजपने तटस्थ राहण्याचे ठरवले. आणि त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे आपोआप कॉंग्रेसकडे गेले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि भाजपने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आपला हक्क सांगितला. मुंबई भाजपतर्फे २८ फेब्रुवारी २०२० रोजी मंगलप्रभात लोढा यांनी महापौरांना विनंतीपत्र देऊन प्रभाकर शिंदे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करण्याची विनंती केली होती मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही विनंती फेटाळून लावली. आणि त्यानंतरच मुंबई भाजपने कोर्टात धाव घेतली.

हे देखील वाचा -    '...तर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल', महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान

का फेटाळला दावा?

मुंबई भाजपकडून संख्याबळाच्या आधारावर पुन्हा एकदा हा दावा करण्यात आला होता. आणि या पदासाठी व पालिकेतील गटनेतेपदासाठी भाजपकडून नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची शिफारस करण्यात आली होती. मात्र हे पद आधीपासूनच काँग्रेसकडे असल्याचं सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळून लावला. हायकोर्टाने सुद्धा ‘ राजकीय समीकरण बदलली किंवा तुमचा विचार बदलला म्हणून एकदा घेतलेला निर्णय पुन्हा बदलु शकत नाही’ असं म्हणत याचिका फेटाळून लावली होती.

Published by: Aditya Thube
First published: February 16, 2021, 4:18 PM IST

ताज्या बातम्या