मुंबई, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे सर्वच जण घरी अडकले आहे. अनेक जण घरी बसल्या-बसल्या सोशल मीडियावरून एकमेकांशी संवाद साधत आहे, तर कुणी गाणे गात आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही फेसबुकवर लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना ट्रोलकऱ्यांचा भयंकर सामना करावा लागला.
सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन ‘आपुलकीचा संवाद’ या शिर्षकाखाली फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओकरून जनतेशी संवाद साधला. फेसबुक लाइव्ह सुरू झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या उपाय योजनांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. लोकांना घरीच राहण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
हेही वाचा -VIDEO:सलमान खान म्हणतोय 'प्यार करोना', COVID-19 वरील गाणं सोशल मीडियावर व्हायरल
पण, हे सगळं सुरू असताना अचानक काही जणांकडून त्यांना नकारात्मक प्रश्न आणि कमेंटचा पाऊस सुरू झाला. लोकं वाटेल ते प्रश्न विचारू लागल्यामुळे मुनगंटीवार यांना चांगलाच घाम फुटला. लोकांनी इमोन्जी, स्मायली आणि भलत्याच कमेंट करून मुनगंटीवार यांची बोलतीच बंद करून टाकली. पण, तरीही मुनगंटीवार यांनी याकडे दुर्लक्ष करून आपले बोलणे सुरूच ठेवले.
एवढंच नाहीतर काही जणांनी मुनगंटीवार यांच्यावरच थेट टीका करण्यात सुरुवात केली. आधीच्या सरकारच्या काळात काय काय कामं केली याच्यावरून टीका सुरू झाल्या. त्यामुळे विषय दुसरीकडे चालला हे लक्षात येताच मुनगंटीवार यांनी फेसबुक लाइव्हमध्येच बंद करून काढता पाय घेतला.
लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं की, त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरून रेकॉर्ड झालेला व्हिडिओही डिलीट करून टाकला.
BJP Maharashtra leaders, Vinod Tawade,Chandrakant Patil,Ram Kadam,Madhav Bhandari & now Sudhir Mungantiwar are badly trolled by Social Media Army. Earlier Many Non-BJP Senior leaders were witnessed by this trolls but Nowadays BJP leaders are targeted by social media users.
— KattaNews (@katta_news) April 20, 2020
कोरोना व्हायरसच्या तणावपूर्ण वातावरणात सोशल मीडियावर भाजपचे नेते ट्रोल होत आहे. याआधीही भाजपचे नेते विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राम कदम, माधव भांडारी यांनाही ट्रोलकऱ्यांचा सामना करावा लागला होता. आता त्यांच्या पंक्तीच सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश झाला आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Chandrakant patil, Ram kadam, Sudhir mungantiwar, Vinod tawade