धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 21 मार्च : पोलिसांची खाकी वर्दी घालून देशसेवा करायची हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते खडतर प्रयत्न करतात. पोलीस भरती हा या स्वप्नपूर्तीच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा असतो. मुंबईत सध्या पोलीस भरती सुरू आहे. या भरतीसाठी येणारे बहुतेक तरुण हे राज्याच्या ग्रामीण भागातील आहेत. भरतीसाठी आल्यानंतर कुठं राहायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. त्यामुळे यापैकी अनेक तरुण शहरातील फुटपाथवर झोपलेले दिसतात.
मुंबईकरांची मदतीला धाव
मुंबईतील सांताक्रुझ, वाकोला परिसरात या भावी पोलीसांना फुटपाथवरच रात्र काढावी लागत आहे. त्यांची परिस्थिती लक्षात घेताच सांताक्रुझमधील श्रीकृष्ण महिला मंडळ मदतीसाठी पुढं सरसावलं आहे. या मंडळाच्या सदस्य आईच्या मायेनं भरतीसाठी आलेल्या तरुणांची काळजी घेत आहेत आहे. त्यांच्यात रक्ताचं नसलं तरी माणुसकीचं नातं निर्माण झालं आहे.
मुंबई पोलिस दलामध्ये भरतीसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांच्या खाण्या-राहण्याची व्यवस्था सांताक्रूझ येथील श्री कृष्ण नगर, कमलाबाई शेट्टी चाळीतील रहिवासी करीत आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अगदी निःस्वार्थी भावनेने ही मंडळी रोज सुमारे 500 ते 600 उमेदवारांना जेवू घालत आहेत.
ST प्रवासात 50 टक्के सवलत मिळाल्यानंतरही महिला नाराज! पाहा काय आहे मागणी, Video
तरुणांसाठी मोफत सुविधा
गृहिणी शिला मिलिंद येवतकर सांगतात की, पोलिस भरतीसाठी आलेल्या मुलांची जेवणाची व्यवस्था होत नव्हती. मात्र आम्ही सुद्धा आई आहोत आमचं मातृत्व जागं झालं. ही आपलीच मुल आहे यांना जेवण दिलं पाहिजे. ही मुलं उपाशी राहता कामा नये. म्हणून परिसरातील महिलांची जमवाजमवी सुरू केली. श्रीकृष्ण महिला मंडळाच्या महिलांकडून हा उपक्रम सध्या राबवला जात आहे.
सर्व घरांतील महिला सायंकाळ झाली की, एकत्र येतात आणि येथील मोकळ्या मैदानात जेवण करायला सुरुवात करतात. साडेसात, आठच्या सुमारास डाळ-भात, एखादी भाजी, तसंच शक्य झालं तर चपाती किंवा पाव असे जेवण तयार असते. जसे उमेदवार येतात, तसे त्यांना पोटभर वाढले जाते. श्रीकृष्ण मंदिराच्या आवारात सतरंजी, पंख्याची व्यवस्था करून त्यांना झोपण्यासाठी देण्यात येते. दररोज सुमारे 500 ते 600 उमेदवार मोफत सुविधेचा लाभ घेत आहेत.
या परिसरातील नागरिक मिलिंद यवतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आमच्या परिसरात अचानक रात्री काही मुलं येताना दिसली. ही मुलं नेमकी आली कुठून असा प्रश्न पडला होता. त्यावेळी माहिती घेतल्यानंतर ते पोलीस भरतीसाठी आल्याचं समजलं. त्यांची राहण्याची आणि जेवणाची कोणतीही सोय नसल्याने मंदिरात त्यांना आश्रय देऊन जेवण्याची आणि राहण्याची एका दिवसापूर्वी सोय करण्यात आली होती.
पुढील एक ते दीड महिने या प्रकारचे प्रशिक्षण सुरू असणार असल्याचे कळलं आणि परिसरातील अनेक महिला जमा झाल्या. चाळीत राहणाऱ्या या महिलांनी आणि रहिवाशांनी मिळून दररोज रात्री एक वेळचं मोफत जेवण या मुलांना देण्यात येत. श्रीकृष्ण नगर मधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरु केला आहे.
गिरगावकर भव्य शोभायात्रेनं करणार नव्या वर्षाचं स्वागत, पाहा काय आहे आकर्षण, Video
गेल्या दोन दिवसांपासून आम्ही मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेलो आहोत. भरतीसाठी आलेले अनेक मुलं ही मोकळ्या पटांगणात रस्त्याच्या कडेला झोपलेली दिसतात. प्रशिक्षण स्थळाच्याजवळ असलेल्या श्रीकृष्ण नगरमधील रहिवाशांनी आमची एक वेळ जेवणाची आणि राहण्याची सोय केली. हे सर्व मोफत त्यांनी आम्हाला पुरवलं, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरमधूल पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणानं दिली.
सरकारकडून पोलीस भरतीच्या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सोय करण्यात येत नाही. त्यांनी किमान राहण्याची आणि जेवणाची सोय करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.