S M L

बाबरी पाडणाऱ्या या कारसेवकाला आज धर्माचीच गरज वाटत नाही!

बाबरी मशीद पाडून आज 26 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर 'वेब न्यूज18 लोकमत'ने अभिजीत देशपांडे यांच्या मनात काय भावना आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या कारसेवकाची संपूर्ण गोष्ट उलगडली.

Akshay Shitole | Updated On: Dec 6, 2018 04:59 PM IST

बाबरी पाडणाऱ्या या कारसेवकाला आज धर्माचीच गरज वाटत नाही!

मुंबई, 6 डिसेंबर : "एक धक्का और दो...बाबरी मस्जिद तोड दो..." 6 डिसेंबर 1992... नेत्यांची आक्रमक भाषणं सुरू होती... लाखोंच्या संख्येने लोक अयोध्येत दाखल झाले होते... आपल्या धर्मावर आतापर्यंत खूप अन्याय झाला आहे... त्याचा बदला घेतला पाहिजे... मुसलमानांचं आक्रमण हटवलं पाहिजे... अशा आक्रमक भावना या गर्दीच्या मनात होता... परभणीचा एक विशीतला तरूणही या गर्दीचा भाग होता... आणि आपण आपल्या धर्माचं फार मोठं काम करण्यासाठी अयोध्येत दाखल झालो आहोत... असं या तरुणाला वाटत होतं.. अभिजीत देशपांडे असं या तरूण कारसेवकाचं नाव.

बाबरी तर पाडली...पण आज अभिजीत देशपांडे यांचा विचार पूर्णपणे बदलला आहे. 'मी राम मंदिराची उभारणी करायला गेलो होतो. काहीतरी पाडण्यासाठी नाही. पण तिथं जे झालं तो माझ्यासाठी एक धक्का होता. बाबरी पाडली जाणं, ही कोणती धार्मिक कृती नव्हती, तर ती एक राजकीय कृती होती. माणसाला चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी कोणत्याही धर्माची गरज नाही,' असं आज अभिजीत यांना वाटतं.

बाबरी मशीद पाडून आज 26 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर 'वेब न्यूज18 लोकमत'ने अभिजीत देशपांडे यांच्या मनात काय भावना आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या कारसेवकाची संपूर्ण गोष्ट उलगडली.

"घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण असल्याने माझ्यावरही हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव होता. त्यातच नव्वदच्या दशकात राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरात रान पेटलं होतं. अनेक हिंदुत्ववादी संघटना देशभरातलं वातावरण ढवळून काढत होत्या. आता राम मंदिर उभारून या देशात पुन्हा एकदा हिंदूंचं वर्चस्व निर्माण केलं पाहिजे, असा प्रचार या संघटनांकडून देशभरात सुरू होता. या वातावरणाने माझ्याही मनात राम मंदिर निर्माण झालंच पाहिजे, ही भावना तयार झाली," असं अभिजीत सांगतात.

"6 डिसेंबर 1992... कारसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे अयोध्येत दाखल झाले. ही संख्या लाखोंच्या घरात होती. कारसेवकांप्रमाणे अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे नेतेही अयोध्येत पोहोचले होतो. भारतात हिंदू बहुसंख्य असून त्यांच्यावर अन्याय होतोय... सरकारकडून एका विशिष्ट धर्माचं लांगूलचालन सुरू आहे... बाबरी हे आपल्यावर झालेल्या अतिक्रमाचं प्रतिक आहे... म्हणूनच... एक धक्का और दो, बाबरी मस्जिद गिरा दो... नेत्यांची अशी आक्रमक भाषणे सुरू झाली. या भाषणांनी आधीच आक्रमक असलेला जनसागर अधिकच पेटून उठू लागला... आणि हा उसळलेला जनसागर बाबरीच्या दिशेनं वाटचाल सुरू करू लागला," असं म्हणत अभिजीत यांनी त्या दिवशी नेमकं काय झालं हे सांगायला सुरुवात केली.

Loading...

अभिजीत सांगतात, "दुपारी 12 वाजता लोक बाबरी मशिदीच्या परिसरात पोहोचले. तिथं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम सुरू झालं. आक्रमक कारसेवक बाबरी पाडत होते. या सगळ्यामध्ये सरकार कुठेच नव्हतं. कारसेवकांनी बाबरीचा विध्वंस केल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास सैन्य दाखल झालं. सैन्याने कारसेवकांना तिथून बाहेर काढायला सुरुवात केली. अनेक विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. कारसेवकांचे जथ्ये आपलं काम करून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. त्याचवेळी मीही परभणीला जाणारी गाडी पकडली."

"बाबरी पाडल्यानंतर वाटलं, आपण आपल्या धर्मावरचा कोणतातरी मोठा कलंक मिटवला आहे. याच विचारात प्रवास सुरू झाला. जसजसं पुढे येत होतो, तसतसं कळत होतं की, सर्व रेल्वे स्थानकांवर मोठा शुकशुकाट पसरला आहे. सगळीकडे जणू स्मशान शांतता पसरली होती. परभणीत पोहचलो तेव्हा सर्वत्र कर्फ्यू लावण्यात आला होता. वातावरणात मोठा तणाव होता. काही दिवसांत देशात मोठ्या दंगली उसळल्या. लोक दहशतीच्या सावटाखाली होते. बाबरी प्रकरणाने हिंदू-मुस्लिम यांच्यातील दरी वाढली होती. निष्पापांच रक्त सांडत होतं," असं म्हणत अभिजीत यांनी बाबरी पाडल्यानंतरच्या घटनेचं वर्णन केलं.

"हे सगळं वातावरण पाहिलं आणि मनात विचार आला, हे सगळं करण्यासाठी मी नक्कीच तिकडं गेलो नव्हतो. आजूबाजूची परिस्थिती पाहून कळालं की याला आपणही जबाबदार आहोत. या विचारानं मी प्रचंड अस्वस्थ झालो... निराश झालो... आणि हीच अस्वस्थता घेऊन परभणी सोडून मुंबई गाठली," असं म्हणत बाबरी पाडणाऱ्या कारसेवकाने त्याची अस्वस्थता बोलून दाखवली.

अभिजीत पुढे म्हणतात,"परभणीतून मुंबईत आल्यानंतर जाणीवपूर्वक अनेक पुस्तकं वाचली. धर्म म्हणजे काय... संस्कृती म्हणजे काय... हे जाणून घेऊ लागलो. आणि बऱ्याच काळानंतरच्या वाचनानंतर लक्षात आलं की चांगला माणूस होण्यासाठी माणसाला कोणत्याही धर्माची आवश्यकता नसते. धार्मिक कट्टरतेची तर अजिबातच नाही."

या सगळ्यातून एका नव्या अभिजीत देशपांडेंचा जन्म झाला. कारसेवक हा त्यांचा भूतकाळ झाला. म्हणूनच 2005 साली त्यांनी 'एक होता कारसेवक' हे पुस्तक लिहिलं. 'मी कारसेवक होते का? तर नक्की होतो... पण आता तो माझा भूतकाळ आहे' हेच या पुस्तकातून ते सांगू पाहतात.

आज अभिजीत देशपांडे मुंबईतील एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसंच सिनेमांविषयीचे विशेष ज्ञान असल्याने अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये त्यांना ज्यूरी म्हणूनही बोलवलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 03:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close