मुंबई, 16 डिसेंबर : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे (metro car shed kanjurmarg) काम थांबवण्याचे आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला धक्का दिला आहे. 'न्यायालयाने काय निर्णय दिला आहे, त्याची आम्ही वाट पाहत आहोत', अशी सावध प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून भाजप आणि शिवसेनेत वाद पेटला आहे. कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर कांजूरमार्गची जागाही राज्याची असल्याचा दावा सेनेनं केला आहे. या प्रकरणी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली.
कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने MMRDA ला दिले आहे. कारशेडच्या जागेची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे.न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
Hon’ble HC has granted a stay to Kanjurmarg work. We await the detailed written order to decide the future course of action.
This land is crucial for Metro Line 6, 4 and 14, apart from 3, as it will save almost ₹5500 crores of Govt and be a nodal point for 1 crore citizens.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 16, 2020
तर 'आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हे खरं आहे. मेट्रो लाईन 3 प्रमाणेच मेट्रो लाईन 6, 4 आणि 14 साठी ही जागा अत्यंत मोक्याची आहे. यामुळे राज्य सरकारचे जवळपास साडे पाच हजार कोटी वाचणार आहे आणि एक कोटी लोकांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
विधी व न्याय विभागाचा सल्ला घेणार - अजित पवार
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाचा निर्णयाचा आढावा घेण्यात येईल. कांजूरमार्ग प्रकरणी विधी व न्याय विभागाचा सल्ला घेणार आहोत, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.