मुंबई,19 सप्टेंबर: अत्यल्प पगारात काम करावं लागत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप मुंबई मेट्रो सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी आज सकाळ पासून संपावर गेले आहेत. हे कर्मचारी आज सकाळपासून घाटकोपर मेट्रो स्टेशनला आंदोलन करत आहेत.
राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने ११ महिन्याच्या करारावर या कामगारांना घेतलं आहे. या कामगारांना गृहखात्याच्या अंतर्गत घेऊन त्यांना पोलिसांसारखा दर्जा द्यावा, तसंच पगार योग्य पद्धतीने मिळावा या व इतर मागण्यांसाठी काम बंद आंदोलन ते करत आहेत. राज्यभरात या दलाचे ९ हजार कर्मचारी आहेत. त्यांना महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात केलं आहे. यात मुंबईत मेट्रो , मोनो , विमानतळ , रुग्णालयं तसंच देवस्थानाच्या सुरक्षेसाठी हे कर्मचारी काम करतात.
हे सुरक्षा रक्षक संपावर गेल्याची जाणीव घाटकोपर स्थानकावरच होऊ लागली आहे. मेट्रोमध्ये जाण्यासाठी प्रवाश्यांच्या रांगा लागल्या आहेत. खासगी सुरक्षा रक्षक तात्पुरते नेमण्यात आले आहेत. तर प्रवाश्यांची तपासणी न करताच सोडण्यात येत आहे. अशावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
'आम्हाला योग्य मानधन द्या' अशी मागणी हे सुरक्षा रक्षक करत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा