राज्यात विमानसेवा सुरू न करण्याबाबत गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, म्हणाले...

राज्यात विमानसेवा सुरू न करण्याबाबत गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, म्हणाले...

राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये प्रमुख विमानतळं आहेत. आणि हीच शहरे रेड झोनमध्ये आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 मे : देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली असताना राज्य सरकार मात्र विमानसेवा सुरू करायला तयार नाही. राज्य सरकारची ही भूमिका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केली आहे. रेड झोन असलेल्या भागात विमानसेवा सुरू केल्यास कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असं राज्य सरकारला वाटत आहे. म्हणूनच सरकारनं ही सेवा सुरू करायला विरोध दर्शवला आहे.

'रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू करणं धोकादायक असून केवळ थर्मल  स्क्रीनिंग करुन काही उपयोग नाही' असं अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'नागरिकांचे स्वॅब न घेता फक्त थर्मल स्क्रीनिंग करण्याला अर्थ नाही,' असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात उद्यापासून रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू होणार नाही हे स्पष्ट आहे.

विमानसेवा सुरू करायची असल्यास त्यासोबतच विमानतळावर ये-जा करण्यासाठी रिक्षा, टॅक्सी, बससेवा सुरू करावी लागेल. मात्र, तसं झाल्यास रस्त्यावर वर्दळ वाढेल आणि सध्याच्या परिस्थितीत तसं करता येणार नाही. कोणत्याही पाॅझिटिव्ह रुग्णाला रेड झोनमध्ये आणणे धोकादायक आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं.

ग्रीन झोनमधील व्यक्तीला रेड झोनमध्ये आणून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती राज्य सरकारला वाटते आहे. तसंच कोरोनाच्या या काळात विमानसेवा सुरू करायची असल्यास विमानतळावरही अतिरिक्त मनुष्यबळाची गरज लागेल. त्याही लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं राज्य सरकारला वाटत आहे.

कोरोनामुळे विमानसेवा गेली जवळपास दोन महिने बंद आहे. पण राज्यात देशांतर्गत सेवा रेड झोनमध्ये सुरू करायला राज्य सरकारचा विरोध आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये प्रमुख विमानतळं आहेत. आणि हीच शहरे रेड झोनमध्ये आहेत. या शहरांमध्ये वाहतुकीच्या इतर व्यवस्था बंद असताना विमान वाहतूक सुरू करणं योग्य होणार नाही असं राज्य सरकारला वाटतं. शिवाय ही विमानतळं सुरू झाल्यावर स्थानिक प्रशासनावर अधिक ताण येईल.

राज्यात चौथा लाॅकडाउन असताना देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसताना विमान वाहतुकीमुळे त्यात भरच पडू शकते.  कोरोनाबाधित क्षेत्रातून काही व्यक्ती राज्यात विमानाने आल्यास त्यामुळेही कोरानाचा संसर्ग वाढू शकतो, अशी राज्य सरकारला भीती आहे. केरळमध्येही विमानाने बाहेरुन आलेल्या प्रवाशांमुळे तिथल्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

राज्य सरकारकडे विमानसेवा सुरू न करण्यासाठी अनेक करण्यासाठी अनेक कारणं असली तरीही हळूहळू वाहतुकीसह अनेक सेवा नियमितपणे सुरू करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यामुळे खीळ बसेल असंही म्हटलं जातंय. एक तर विमानात रेल्वेपेक्षा कमी प्रवासी असतात. विमानतळावर गर्दी नियंत्रणात आणता येते. दूरवर असलेल्यांना सहजपणे आपल्या इच्छित ठिकाणी जाता येईल.

विमान प्रवास बस आणि रेल्वेच्या तुलनेत कमी वेळात होत असल्याने संसर्गाचा कमी धोका आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने इथले व्यावसायिक व्यवहार विमानसेवेमुळे सुरू होऊ शकतात. आणि त्यामुळे राज्याचा आर्थिक गाडा सुरू व्हायला मदत होऊ शकते. शिवाय दोन महिने विमानसेवा बंद असल्याने विमान कंपन्यांवरही मोठा आर्थिक ताण आला आहे. विमान सेवा सुरू झाल्यास तोही कमी होऊ शकतो.

 

संपादन - सचिन साळवे

First published: May 24, 2020, 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading