विजय वंजारा, नवी दिल्ली, 26 मार्च : मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल 13 वर्षांनी चार बछड्यांचा जन्म झाला आहे. शनिवारी दुपारी 12.30 ते 3 च्या सुमारास वेळेत श्रीवल्ली या वाघिणीने बछड्यांना जन्म दिला. बाजीराव वाघ आणि श्रीवल्ली वाघिणीची ही पिल्ले असून ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांच्या देखरेखीखाली आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सन 2010 मध्ये बछड्यांचा जन्म झाला होता. या वाघांपैकी लक्ष्मी सध्या उद्यानात आहे. बंदिस्त वातावरणात राहणाऱ्या प्राण्यांना जन्म देणे ही सोपी गोष्ट नसते, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी सांगितले. श्रीवल्लीला मार्च 2022मध्ये उद्यानात आणले होते. तिला ताडोबा येथे पकडण्यात आले होते. तर बाजीरावला चंद्रपूर जिल्ह्यात राजोरा येथे पकडले होते. त्याला डिसेंबर 2020 मध्ये मुंबईत आणले होते. बंदिस्त परिसरामध्ये प्राण्यांमध्ये लैंगिक संबंध निर्माण झाले, तरी मादी जन्म देईल, याची खात्री नसते. बंदिस्त जागेत असलेल्या इतर प्राण्यांमुळे तिला तिच्या बछड्यांना मारून टाकण्याची भीती वाटते. त्यामुळे अशा वातावरणात गर्भधारणा कठीण असते.
हेही वाचा - 'ही' हत्तीण खेळतेय चक्क क्रिकेट आणि फुटबॉल! पाहण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा Video
श्रीवल्लीला वेगळे ठेवण्यात आले होते. तिच्यासाठी गुहेप्रमाणे उबदार वातावरण तयार करण्यात आले. तिने नैसर्गिक पद्धतीने बछड्यांना जन्म दिला असून तिला आणि बछड्यांना त्रास होऊ नये, यासाठी तिच्या आसपास शनिवारी अधिकारीही फिरकले नाहीत. तिच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे. श्रीवल्लीची ही पहिलीच गर्भधारणा असल्याने ती बछड्यांची कशी काळजी घेईल, त्यांना नाकारणार नाही ना, असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांसमोरही आहेत. मात्र जन्मानंतर तिने बछड्यांना साफ करून दूधही पाजले असल्याने ही चिंता थोडी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीवल्ली जेव्हा त्यांच्या मुख्य पिंजऱ्यापासून दूर जाईल, तेव्हा उपलब्ध वेळेत बछड्यांचे वजन तपासून, त्या जागेची साफसफाई करण्यात येईल. त्यानंतर 15 दिवसांमधून एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. हे बछडे मोठे होण्याच्या प्रक्रियेमध्ये कमीत कमी मानवी हस्तक्षेप आवश्यक असल्याने ही काळजी घेण्यात येत आहे. या चार बछड्यांच्या जन्मामुळे आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण 10 वाघ झाले आहेत. श्रीवल्लीचे वय चार वर्षे आहे. वाघांच्या गर्भधारणेचा काळ सुमारे तीन ते सव्वातीन महिने इतका असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Tiger, Viral, Wild animal