13 आॅक्टोबर : मनसेच्या नगरसेवकांनी सेनेत यायचं सांगितलं आम्ही स्वागत केलंय. आम्ही केली तर गद्दारी त्यांनी केली तर खुद्दारी ? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या सहाही नगरसेवकांना शिवबंधनाचा धागा बांधलाय. तसंच ही फोडाफोडी नाहीतर घरवापसी आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
शिवसेनेनं मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हायजॅक केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केलीये. 'मातोश्री'वर या सहा नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
'ही तर घरवापसी'
या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला हे सर्व नगरसेवक पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच होते. या सगळ्यांच्या मनात शिवसेनाच होती. आज त्याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुळात हे फोडाफोडी नव्हत तर ही घरवापसी होती, हे सर्व आपल्या स्वगृही परत आले आहे. जर आमच्या फोडाफोडीचा आरोप होत असेल तर इतरांनी केली ती खुद्दारी आम्ही केली तर गद्दारी हे कसे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थिती केला.
''मातोश्री'वर त्यांचा मोठा भाऊ असतो'
हे ऑपरेशन एका दिवसात झालं असं तुमचा समज असेल तर शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज आला असेल. त्यांनाही कळालं असेल त्यांचाही भाऊ 'मातोश्री'वर राहतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
'भाजपला मुरडा मुबारक'
भाजप आम्हाला मित्रपक्ष म्हणवत असेल तर त्यांनी आमच्या आनंदात सहभागी व्हावं. आम्ही दुसऱ्या पक्षातले नगरसेवक घेतले तर भाजपच्या पोटात का दुखतंय. हा घोडेबाजार असेल तर भाजपनं उत्तरांचल, अरूणाचलमध्ये काय केलं ते काय होतं ? मित्र आहात ना तर मित्राच्या आनंदात सहभागी झालं पाहिजे, मुरडा आला असेल तर भाजपला मुरडा मुबारक अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. तसंच घोडेबाजारीचा आरोप गाढवांनी करू नये असा टोलाही उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांना लगावला.
'मोदी लाट आता ओसरली'
तसंच नांदेडमधला काँग्रेसचा हा विजय म्हणजे मोदी लाट ओसरली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या विजयाबद्दल काँग्रेस आणि अशोक चव्हाणांचं अभिनंदनही केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा