विलास बडे,प्रतिनिधी
मुंबई, 21 नोव्हेंबर : हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष... पण भविष्यात शिवसेनेला सत्तेसाठी ही ओळख बदलावी लागणार आहे. कारण काँग्रेससोबत जावू इच्छिणाऱ्या शिवसेनेनं सुरू केलेला सावरकरांचा जयजयकार काँग्रेसला मान्य नाही.
दिल्लीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी खलबतं सुरू असतानाच शिवसेनेच्या खासदारानं लोकसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी करुन एकच खळबळ उडवून दिली. तर काँग्रेसचा मात्र शिवसेनेच्या या मागणीला कडाडून विरोध आहे. त्यामुळे सत्तेचं समीकरण जुळण्याच्या आधीच सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना आमनेसामने उभे ठाकले आहे.
हे कमी म्हणून की काय काँग्रेसच्या अटीनंतर महाशिवआघाडीतून शिव काढून टाकण्याचा निर्णय झाल्याचं कळतंय. आघाडीचं नामकरण महाविकासआघाडी असं करण्यात आल्याचं समोर येताच भाजपनं मात्र टीकेची झोड उठवली आहे.
मागील अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. १९ नोव्हेंबरला यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा यासाठी शिफारशीची गरज नाही असं केंद्र सरकारनं सांगितलं. त्यात शिवसेनेनं ही मागणी पुन्हा लावून धरली आहे.
खरंतर शिवसेनेनं आजवर सातत्यानं जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली. पण, मुख्यमंत्रिपदाचं स्वप्नं साकार करण्यासाठी काँग्रेसला सोबत घेवू इच्छिणाऱ्या शिवसेनेला प्रखर हिंदुत्व अडचणीचं ठरतंय. त्यात काँग्रेसला सोबत घेण्यासाठी संजय राऊतांनी थेट शिवसेना आणि बाळासाहेब कसे सेक्युलर होते हे सांगायलाही सुरूवात केली आहे.
बाबरी मशीद आम्हीच पाडली असं अभिमानानं सांगणारी, 'गर्व से कहो हम हिंदू है, पहिले मंदिर फिर सरकार' असा नारा देणाऱ्या हिंदुत्ववादी शिवसेनेचा सेक्युलर प्रवास सुरू होताच शिवसेनेनं पहिले सरकार फिर मंदिरची भूमिका घेतली. त्यामुळे भविष्यात शिवसेना जाज्वल्य हिंदुत्वाला मुरड घालून सेक्युलर होणार की, आपल्या राजकारणाचा आत्मा असलेलं हिंदुत्व कायम ठेवणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
====================================