मुंबई, 13 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री होऊ शकतात. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आदित्याला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्या आहेत.
'वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराष्ट्र खरंच तूझी वाट बघत आहे.', असं ट्विट करून संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं. पण वयाच्या तिसाव्या वर्षी मुख्यमंत्री होण्याइतपत आदित्य ठाकरेंचा अनुभव आहे का ? कारण शरद पवार राज्याचे आतापर्यंतचे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. वयाच्या 38व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. वयाच्या 27 व्या वर्षी आमदार आणि 31 व्या वर्षी शरद पवार कॅबिनेट मंत्री बनले होते.
17 ऑक्टोबर 2010 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत युवा सेनेची स्थापना करण्यात आली. म्हणजेच आता आदित्य ठाकरेंची राजकारणात नऊ वर्षांची वाटचाल झाली आहे. मात्र, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आदित्य यांचा सहभाग असतो.
राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी युवा सेना पोहोचवली. युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी युवक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला प्राधान्य दिलं. मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरानं लागत असल्याचा मुद्दा त्यांनी हाती घेतला होता. मुंबईत नाईट लाईफसाठी आणि रूफ टॉप हॉटेलसाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. मुंबईत अनेक ठिकाणी ओपन जिम सुरू करण्यात आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला. यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची त्यांनी मदत घेतली होती. मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं निवडणूक लढवण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आदित्य यांनी बोलणं टाळलं.
लोकसभा निवडणुकीत दमदार यशानं युतीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. चार महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याची खात्री युतीला वाटत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना वांद्रे पूर्व, माहिम, शिवडी आणि वरळी या चार मतदारसंघापैकी एका मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तसं झालं तर मुख्यमंत्रिपदाच्या दृष्टीनं हे आदित्य यांचं पहिलं पाऊल असेल.
===========================