Home /News /mumbai /

...तर राणा दाम्पत्याला तीन वर्ष कारासावासाची शिक्षा होईल? उज्ज्वल निकम यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

...तर राणा दाम्पत्याला तीन वर्ष कारासावासाची शिक्षा होईल? उज्ज्वल निकम यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

"राणा दाम्पत्याने राजद्रोह होईल, अशी कोणती कृती केली? याचे पुरावे पोलिसांना न्यायालयाकडे द्यावे लागतील", अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

    नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 24 एप्रिल : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आलाय. या संदर्भात राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी (Ujjwal Nikam) कायदेशीर भूमिका मांडली आहे. राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप असल्याचं न्यायालयाला सांगितलं. याच मुद्द्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. "राणा दाम्पत्याने राजद्रोह होईल, अशी कोणती कृती केली? याचे पुरावे पोलिसांना न्यायालयाकडे द्यावे लागतील. त्यानंतर न्यायालय ते पुरावे पडताळून पाहील. त्यानंतरच राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या कलमाखाली आरोपी आहेत किंवा नाही हे सिद्ध होईल", असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. हा आरोप सिद्ध झाला तर राणा दाम्पत्याला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते, असेही ते म्हणाले. दरम्यान, "ब्रिटिशांनी राजद्रोहाचं कलम अस्तित्वात आणलं होतं. कोणत्याही व्यक्तीने सरकार विरुद्ध वक्तव्य करून सरकारची बदनामी किंवा सरकारला आव्हान होईल, अशा प्रकारची भूमिका घेतली तर त्याला राजद्रोहाच्या कलमाखाली शिक्षा करण्याची तरतूद होती. त्यानंतर हे कलम अस्तित्वात असावं का? या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी आपले मत मांडले आहे. परंतु आज देखील हे कलम कायद्यात समाविष्ट आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे", असे उज्वल निकम म्हणाले. ('मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी', जितेंद्र आव्हाडांची थेट टीका) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackery) यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याच्या इराद्याने आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजचा मुक्काम जेलमध्ये काढावा लागणार आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचणार अशी गर्जना केली होती. मात्र, शनिवारी मुंबई पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांची आज संध्याकाळी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याचा RTPCR चाचणीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दोघांना सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून हलवण्यात आले. रवी राणा यांना तळोजा जेल येथे हलवण्यात येणार आहे. तर नवनीत राणा यांना भायखळा महिला जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. राणा दाम्पत्याचा आजचा मुक्काम हा जेलमध्ये असणार आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Maharashtra politics, नवनीत राणा

    पुढील बातम्या