मातोश्रीतून मुंबईतील शिवसेना नगरसेवकांना खास आदेश

मातोश्रीतून मुंबईतील शिवसेना नगरसेवकांना खास आदेश

महानगरपालिकेमध्ये तब्बल वर्षभराने शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल वर्षभराने शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. शिवसेनेतील अंतर्गत वाद, कोरोनाची पार्श्वभूमी, स्थायी समिती अध्यक्ष यांचा कारभार या सर्वांमुळे गेले वर्षभर शिवसेनेच्या नगरसेवकांची अंतर्गत बैठक पार पडली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोडी नाराजी अनेकदा चव्हाट्यावर आली. इतकंच नाही तर महापालिकेत महापालिकेतील नेत्यांचे वर्चस्व राहिले नाही, असंही बोललं जातं.

कोरोनाकाळ प्रशासनाला मिळालेले अधिकार यामुळे प्रशासन डोईजड होत आहे. नगरसेवकांना कुठलीही मदत करत नाहीत, अशी भावना सर्व नगरसेवकांची झाली होती. त्यात मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कारभारावर आदित्य ठाकरे यांची नजर आणि हस्तक्षेप असल्यामुळे नगरसेवकांची होणारी कोंडी यामुळे पक्षातील वातावरण अतिशय गढूळ झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची ही बैठक या परिसरातील परिस्थिती, लोकांचा असलेला सूर, नगरसेवकांच्या मनात असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

या बैठकीबद्दल माहिती देत असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं सांगितलं. येणारा प्रत्येक फोन नगरसेवकांनी उचलावा... लोकांशी मृदू शब्दात बोलावं...गरज भासल्यास बेड उपलब्ध करून द्यावा,अशाच सूचना महापौरांनी नगरसेवकांना केल्या. या सूचना करत असताना कोरोनाच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करा, असाही सल्ला महापौरांनी नगरसेवकांना दिला आहे. मातोश्रीवरून अशा सूचना आल्यानंतरच महापौरांनी नगरसेवकांना असा सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा- 'GST चे पैसे आले आता विकास करून दाखवा', अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं आव्हान

कोरोना लसीकरणाचा वेग मंदावण्यासाठी केंद्र सरकारचं कोवीन ॲप जबाबदार असल्याचे महापौरांचे म्हणणं आहे. केंद्र शासनाने हे सर्वाधिकार राज्य सरकारला दिले असते, तर ही वेळ आली नसती. कोवीन ॲप चार चार दिवस बंद राहते. त्यामुळे अनेकांना नोंदणी करता येत नाही. केंद्र शासनाच्या सूचना शिवाय आम्हाला पुढचा टप्पा घेता येत नाही, अशी टीका महापौरांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणार आहोत, असंही महापौरांनी सांगितलं आहे. त्यामुळे एकूणच नगरसेवकांचे लसीकरण सुद्धा लांबणीवर पडलं असल्याचं दिसून येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 22, 2021, 10:23 PM IST

ताज्या बातम्या