मुंबई, 25 ऑक्टोबर : बिहारमध्ये निवडणुका (bihar assembly election 2020)जिंकण्यासाठी मेळावे घेतले जात आहे. आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत असल्यामुळे टीका केली जात आहे. पण जनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात घेत आहो, असं शिवसेनेचे (Shivsena)खासदार संजय राऊत (sanjay Raut)यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पण सेनेच्या या मेळाव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.
'दसरा मेळावा घेऊ नये असं विरोधक म्हणत आहे. पण हा नियम मग मोहन भागवत यांनाही लागू होत नाही का? सरसंघचालक हे आमचे आदरणीय आहे. पण त्यांनी देखील नागपूरच्या रेशीमबागेतील सभागृहात दसरा मेळावा घेतला आहे. त्याच प्रकारे आम्हीही शिवाजी पार्कवरील वीर सावकर सभागृहात दसरा मेळावा घेत आहोत. त्यामुळे जनाची आणि मनाची ही कुणी कोणाची काढायची आणि ठेवायची? असा सवाल करत संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.
'विधानसभेवर फक्त भगवा फडकावचा नाही. पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा, असा तो दसरा मेळावा मागील वर्षी घेण्यात आला होता. आता मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असंही राऊत म्हणाले.
बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात आहे. या सभांना हजारोंची गर्दी आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते, अगदी पंतप्रधानांसह अनेक नेते सभा घेत आहे. तिथं जनाची, मनाची, तनाची, धनाची कसली लाज बाळगायची? निवडणुका जिंकण्यासाठी, मतांसाठी लाखोंचे मेळावे चालतात पण एक ऐतिहासिक दसरा मेळावासाठी जनाची मनाची काढली जाते? जनाची मनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात आम्ही घेत आहोत', असंही राऊत यांनी ठणकावून सांगितले.
'विरोधीपक्षांनी सात्यत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर पडत नाही, अशी टीका केली जात आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. त्यामुळे याचे भान बाळगले पाहिजे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना योग्य ते उपचार मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला सुचना दिल्या आहेत, अशी माहितीही राऊत यांनी दिली.