मुंबई, 14 डिसेंबर : राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यासाठी मात्र सरकारची तिजोरी खुली आहे. मंत्र्यांनी आपल्या बंगल्यासाठी थोडे थोडके नाही तर तब्बल 90 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची बाबसमोर आली आहे. त्यानंतर गेल्या 5 वर्षांपासून या बंगल्यांची दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे खर्च करण्यात आला असा खुलासा राज्य सरकारने केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या बंगल्यावर 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एकीकडे सरकार निधी नसल्याचे सांगत असल्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांचा बंगलाही डिफॉल्टरच्या यादीत
त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री सतेज पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. गेल्या 5 वर्षात बंगल्याची दुरुस्ती झाली नाही, त्यातच मुंबईतील हवामान पाहता बंगले खराब झाले होते. त्यामुळे बंगल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे, असंही पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर 3 कोटी 26 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर 1 कोटी 78 लाख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सातपुडा बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 33 लाख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगलावर दोन कोटी 26 लाख खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये आणखी इतर मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. असा एकूण 90 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, राज्यावर कोरोनाचे संकट असल्यामुळे तिजोरीत खडखडात असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील सर्व काम हे धीम्या गतीने सुरू आहे. अनेक आमदारांना निधी दिला गेला नसल्याचे समोर आले असताना मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केला जात असल्यामुळे टीका होत आहे.