मुंबई, 29 सप्टेंबर : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता अनेक ठिकाणांवरील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मात्र मुंबईत अद्याप कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली नाही, हे कारण देत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. त्यात सर्व कार्यालयं सुरू करण्याची परवानगी दिली तर गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग बळावू शकतो. यामुळे उपनगरीय रेल्वेवरील भार कमी करण्यासाठी कार्यालयाच्या भिन्न वेळा असल्याची गरज व्यक्त केली जात असताना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना युवा नेते आणि पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी एका वृत्रपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणि लोकसंख्येचा विचार करता कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. कार्यालयातील कामासाठी पूर्ण 24 तासाचा वापर करता येतो का, यावर विचार सुरू आहे. यातून लोकल सेवेवर अतिरिक्त ताण येणार नाही. तसे झाले तर ऑक्टोबरपासून सर्वांसाठी लोक सुरू होऊ शकते. याबाबत उद्योजकांशीही संवाद सुरू असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
हे ही वाचा-आदित्य ठाकरेंसह 15 मंत्र्यांना वीजबिलचं नाही; सर्वसामान्यांचे मात्र हाल
सध्या अत्यावश्यक सेवेसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र त्यातही कोरोनाच्या काळात वाढती गर्दी ही चिंतेची बाब आहे. लोकल बंद असल्याने बस व इतर सेवेंवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यात वाहतूक कोंडीचे प्रकारही वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग करीत आंदोलन केलं होतं.
दरम्यान पश्चिम रेल्वेनं कोरोना काळात महिलांसाठी विशेष लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या महिलांसाठी पश्चिम रेल्वेवर महिला विशेष लोकल धावणार आहे. दोन लोकल फेऱ्या असतील पहिली महिला विशेष लोकल सकाळी विरार-चर्चगेट सकाळी 7.35 वाजता तर संध्याकाळी 6.10 मिनिटांनी चर्चगेट विरार अशी दुसरी लोकल असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.