...म्हणून सीबीआयला आता महाराष्ट्रात नो एंट्री, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

...म्हणून सीबीआयला आता महाराष्ट्रात नो एंट्री, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

'सीबीआय, ईडी असेल त्यांना थोडेफार चौकशी करण्याचे अधिकार आहे. पण, त्या अधिकारांचा गैरवापर हा ज्या राज्यात विरोधकांचे राज्य आहे'

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारने राज्यात परवानगी न घेता सीबीआयला तपास करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. 'भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये यंत्रणांचा गैरवापर होत आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे' असं परखड मत शिवसेनेचे खासदार राऊत यांनी व्यक्त केले. तर केंद्र आणि राज्यात यामुळे संघर्ष निर्माण होईल, अशी टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी राज्य सरकारने सीबीआयबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल समर्थन करत भाजपवर टीका केली आहे.

'सीबीआय, ईडी असेल त्यांना थोडेफार चौकशी करण्याचे अधिकार आहे. पण, त्या अधिकारांचा गैरवापर हा ज्या राज्यात विरोधकांचे राज्य आहे, आपल्या विचारांचे राज्य नाही, आपली कुणी बदनामी करत असेल, अशा ठिकाणी केला जात आला आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

तसंच, 'पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशमध्ये असे प्रकार पाहण्यास मिळाले आहे. महाराष्ट्र शेवटेच राज्य आहे. असे प्रकार वारंवार होत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. कोणत्याही प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचले की, ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणा ही कुठे तरी वेगळ्या राज्यात गुन्हा करून तपासासाठी महाराष्ट्रात दाखल होते. महाराष्ट्राला अस्मिता आहे, मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. सरकारच्याही तपास यंत्रणा आहे. त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान,  केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काय करावे हे राज्य घटनेनं ठरवले आहे. सीबीआय असे थेट कुठल्याही राज्यात घुसून तपास करत नाही. कोर्टाने आदेश दिल्यानंतर सीबीआय हस्तक्षेप करत असते किंवा एखाद्या राज्याने मागणी केली आणि सुमोटो दाखल केला असेल तर सीबीआय तपास करण्यासाठी येत असते, असं प्रत्युत्तर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.

'राज्य सरकार आणि केंद्र सरकार संघर्ष उभा करणे हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. अशा निर्णयामुळे वेगळा संघर्ष त्या ठिकाणी उभा राहील. राज्य सरकारचा निर्णय हा अयोग्य आहे, असंही दरेकर म्हणाले.

तर, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भीती वाटत आहे. त्यांना आपले घोटाळे बाहेर निघतील याची चिंता आहे. त्यांची गुंडागर्दीला थांबून जाईल, कोणताही पत्रकार त्यांच्याविरोधात बोलला तर त्याला जेलमध्ये टाकले जात आहे, यासाठी सीबीआयला राज्यात एंट्री देण्यात येत नाही, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला.

Published by: sachin Salve
First published: October 22, 2020, 10:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या