मुंबई, 25 मे : परप्रांतीय मजुरांना श्रमिक रेल्वेनं त्यांच्या मुळगावी सोडण्यावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पियूष गोयल यांना सणसणीत टोला लगावला आहे.
रेल्वे मंत्रालय मजुरांना सोडण्यासाठी महाराष्ट्रासाठी गाड्याच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर पियूष गोयल यांनी राज्य सरकारवर पलटवार केला करत 125 सोडण्यासाठी तयार आहोत. पण महाराष्ट्र सरकारने मजुरांची यादी दिलीच नाही, अशी टीका गोयल यांनी केली होती.
हेही वाचा -पडद्यामागे मोठ्या हालचाली? शरद पवारांच्या पाठोपाठ राणेही राज्यपालांना भेटणार
संजय राऊत यांनी ट्वीट करून पियूष गोयल यांना चांगलाच टोला लगावला आहे. 14 मे रोजी सुटलेल्या नागपूर-उधमपूर रेल्वेसाठी कुठली यादी घेतली होती. आधी रेल्वेनंतर माणसं जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? असा प्रश्न राऊत यांनी गोयल यांना विचारला.
पियुषजी,@PiyushGoyal १४ मे २०ला सुटलेल्या नागपुर - ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता म यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका. @PawarSpeaks @CMOMaharashtra
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 25, 2020
तसंच, पियूष गोयल हे महाराष्ट्राचेच प्रतिनिधी आहेत, तेव्हा राज्याच्या बाबतीत असे प्रश्न चिवडत बसू नये. राज्यातून अनेक गाड्या यादीशिवाय सुटलेल्या आहेत. यादी वगैरे कशाला मागता ? विरोधी पक्षाचे सरकार आहे या भूमिकेतून बाहेर पडला तर यादी मागण्याचा प्रश्न येणार नाही. फक्त महाराष्ट्राकडे यादी का मागितली जात आहे आणि तेही महाराष्ट्राचेच केंद्रातील मंत्री मागत आहे. याबद्दल खेद वाटतो. आम्हाला अपेक्षित गाड्या मिळाल्या नाहीत, हे बोलल्यावर गोयल यांनी चीड व्यक्त केली असावी', अशी आठवणही राऊत यांनी करून दिली.
'बाहेरच्या कामगारांसाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज काढावा लागेल आणि सगळ्यांना पारखून घ्यावं लागेल. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील लोकांची चिंता करावी. इकडून गेलेल्या मजुरांना तिथं नरक यातना सोसाव्या लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दोष देवू नका. इथं त्यांची कशी काळजी घेतली त्याच्या व्हिडिओ क्लिप आम्ही त्यांना पाठवल्या. मजूर इथून जाताना उद्धव ठाकरे व महाराष्ट्राचा जय-जयकार करत होते. हे योगींना आवडले नसावे', असा टोलाही राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला.
हेही वाचा -डॉक्टरांची मान शरमेनं झुकली, मनमाडमध्ये संतापजनक घटना
'राजभवन असा परिसर आहे की तिथं वारंवार जावं वाटतं. तिथं चांगली माणसं राहायला येतात. त्यांच्याशी संवांद साधण्यात आनंद वाटतो. राज्यपाल चांगले असले, मायाळू असले तर आमच्यासारख्यांना चहापाण्याला बोलवतात. नियुक्तीचे अधिकार हवे असतील तर त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसोबत बोलायला हवं' असंही राऊत म्हणाले.
तसंच, मुख्यमंत्री ज्या पक्षाचा असतो, त्याच्या नावाने सरकार ओळखले जाते, असं म्हणत राऊत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव न घेता टोला लगावला.
याआधीही राऊत यांनी गोयल यांना टोला लगावला होता. 'महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियूष गोयल यांना फक्त एक विनंती आहे की, ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये म्हणजे झालं, अशा शब्दांत संजय राऊत यांना टोला लगावला होता.