ST संपामुळे छोटे व्यावसायिक आणि फेरीवाले हताश; दररोजची भाकरी हिरावली
ST संपामुळे छोटे व्यावसायिक आणि फेरीवाले हताश; दररोजची भाकरी हिरावली
एसटीच्या संपाचा मोठा फटका बस स्थानकातील या व्यावसायिकांना बसला असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून त्यांचे घर कसे चालवायचे, बँकेची हप्ते कसे फेडायचे, कामगारांचे पगार कुठून द्यायचे इत्यादी प्रश्न गेल्या पाच दिवसांपासून भेडसावू लागले आहेत.
खेड, 11 नोव्हेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातल्या (Ratnagiri) एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St employee strike) तीव्र होत चालला आहे. यातच हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे काय, असा प्रश्न समोर आला आहे. "आम्ही जगायचं तरी कसं", असा सवाल हताश झालेले फेरीवाले आणि प्रवाशांवर आधारित असलेल्या छोट्या व्यावसायिक विचारत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एसटी बस स्थानकात उसाचा रस विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर तर आता उपासमारीची वेळ आलेली पाहायला मिळत आहे. अनेकांनी कामगारांना पुन्हा गावी पाठवले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. एकंदरीतच एसटीच्या प्रवाशांवर अवलंबून असलेल्या उसाचा रस विकणारे तसेच कँटिन चालक व इतर छोटे व्यावसायिक अडचणीत आलेले पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा-आतापर्यंत एसटीच्या 2053 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन; पुण्यातील आकडा सर्वाधिक
उसाचा रस विकणारा व्यावसायिक तसेच बस स्थानकातील एसटी कँटिन चालवणारे तसेच इतर गोळ्या बिस्कीटं, फळांची विक्री करणारे दुकानदार आणि फेरीवाले यांची उपासमार होत आहे. एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस असल्याने गेले पाच दिवस बस स्थानकातील या व्यावसायिकांचा धंदा पूर्णपणे ठप्प आहे.
एसटी बंद असल्याने एकही प्रवासी स्थानकात येत नाही. त्यामुळे त्यांचा एक रुपयाचा देखील धंदा होत नाही. दररोज चालणारी भाकरी आता त्यांची हिरावली असून बस स्थानकातील उसाचा रस विकणाऱ्या व्यावसायिकांनी आपले कामगार व्यवसाय होत नाही म्हणून पुन्हा गावी पाठवले असल्याचे सांगितले. एसटीच्या संपाचा मोठा फटका बस स्थानकातील या व्यावसायिकांना बसला असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून त्यांचे घर कसे चालवायचे, बँकेची हप्ते कसे फेडायचे, कामगारांचे पगार कुठून द्यायचे इत्यादी प्रश्न गेल्या पाच दिवसांपासून भेडसावू लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.