मुंबई, 15 नोव्हेंबर: कोरोनामुळे (Corona) गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर सोमवारपासून उघडलं जाणार आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी माहिती दिली की, 'सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे.' भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज असल्याचंही बांदेकर म्हणाले. सिद्धिविनायक मंदिरात केवळ मुंबईतूनच नाही तर राज्यभरातूनही भाविक दर्शनासाठी येत असतात.
काय आहेत नियम?
8 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. पण त्यासाठी भाविकांना सिद्धिविनायक मंदिराचं App डाऊनलोड करावं लागणार आहे. पहिल्या दिवशी 1000 हजार भाविकांना देवाचं दर्शन घेता येणार आहे. भाविकांनी मंदिराबाहेर विनाकारण गर्दी करु नये असं आवाहन आदेश बांदेकर यांनी केलं आहे. भाविकांना दिलेल्या नियोजित वेळेत मंदिरात दर्शन मिळणार आहे. मंदिरात आल्यानंतर भाविकांना सिद्धिविनायक टेंपल Appचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. अशी माहिती आदेश बांदेकर यांनी दिली. मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या सगळ्या गाइडलाइन्सचं पालन करावं लागणार आहे. वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांसाठी व्हर्च्युअल दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
दुपारी नैवेद्य आणि आरतीची वेळ आणि संध्याकाळची आरतीची वेळ वगळता भाविकांना इतर वेळेत दर्शन घेता येणार आहे. मास्क असल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांच्या तापमानाची नोंद केली जाईल. तापमान सामान्य असेल तरच मंदिरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळणार आहे. मंदिरात आणि मंदिर परिसरात फिजिकल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.