Home /News /mumbai /

'अडीच वर्षात राष्ट्रवादीने शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला', श्रीकांत शिंदेंचं आक्रमक भाषण

'अडीच वर्षात राष्ट्रवादीने शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला', श्रीकांत शिंदेंचं आक्रमक भाषण

श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केला. अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.

    ठाणे, 25 जून : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यात (Thane) मोठं शक्ती प्रदर्शन केलं. या शक्ती प्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण केलं. श्रीकांत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला. अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. विशेषत: राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेच्या आमदारांना जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला. "आमदार निघून गेले त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. अडीच वर्षात पक्ष फक्त खाली गेला आहे. शिवेसेनेला दाबण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून झाला. विशेषत: राष्ट्रवादीकडून सर्वाधिक दाबण्याचा प्रयत्न झाला. आमदारांना पक्ष वाढावं असं वाटत होतं. आम्ही नेतृत्वाकडे भरपूरदा तक्रार केली. पण आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून आमदार शिंदेंकडे यायची", असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांचं आक्रमक भाषण जसंच्या तसं "आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले आहेत. तीन-चार दिवसांपासून आपण पाहतोय, कशाप्रकारे घडामोडी घडत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने शिंदे यांच्या समर्थनार्थ तुम्ही उभे राहिलेत. शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने जमले. फक्त ठाणेच नाही त्याबाहेरही शिंदेंनी केलं ते कसंकाय बरोबर आहे त्यासाठी त्यांना समर्थन दिलं. आपण आज पाहतोय शिवसेनेचा भगवा झेंडा गौरवाने फडकतोय. एकनाथ शिंदे सांगत आहेत की आम्ही शिवसेनेतच आहोत", असं श्रीकांत म्हणाले. (रात्रभर एअरपोर्ट सुरू अन् राजकीय खलबतं; फडणवीस गुपचूप इंदूरहून वडोदऱ्याला रवाना) "शिवसैनिक आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज ज्याप्रकारे या महाराष्ट्रात मोठी घडामोड घडलेली आहे. शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार सोबत आहेत. इतिहासातील ही पहिली घटना असेल की एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी शिंदेंवर विश्वास दाखवला. याला काहीतरी कारण आहे. इतक्या दिवसांपासून मनामध्ये धुसफूस होती. या सगळ्या गोष्टींचा विस्फोट झालेला आहे. हे इतक्या संख्येमध्ये लोकं का उपस्थित राहिले आहेत हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शिंदे यांच्यासोबत तब्बल 50 आमदार आहेत. ते ज्या क्षेत्राचं नेतृत्व करतात असं चार-पाच लाख लोकांचं नेतृत्व करतात. अडीच वर्षे जी अनैसर्गिक आघाडी झाली त्यातून आपण बाहेर पडलो असं त्यांना का वाटलं? कुणाचातरी यामध्ये दोष असेल. काहीतरी त्रास होत असेल. एकनाथ शिंदेंना होत असेल किंवा पाच लोकांना होत असेल, पण 50 लोकांना? आणि सारखाच त्रास? यावर विचार झाला पाहिजे", अशी भावना श्रीकांत यांनी व्यक्त केली. "गेल्या अडीच वर्षाच राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसही सत्तेत आहेत. तळागळ्यातील कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की, आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्हाला चांगले दिवस येतील. पण आज काय होतंय? कार्यकर्त्याची एकच तक्रार आहे की, आज या राज्यात शिवसेनेची महाविकास आघाडीची सत्ता आहे. पण हा कार्यकर्ता गेले कित्येक वर्ष भगवा झेंडा घेऊन रडतोय. आपली सत्ता आल्यावर रस्ता बनेल, असं त्याला वाटलं होतं. माझ्या सरकारकडून रस्ता बनेल", असं श्रीकांत म्हणाले. "आपल्याला सांगू इच्छितो उद्धव ठाकरेंनी आम्हा सर्व खासदारांना शिवसंपर्क अभियानाला पाठवलं. आपली महाराष्ट्रभरची परिस्थिती पाहण्यासाठी पाठवलं. मी स्वत: परभणी, साताऱ्यात गेलो. तिकडे गेल्यानंतर जी परिस्थिती ऐकली, कार्यकर्त्याचं मी बोलत नाही. मी आमदाराचं रडगाणं बोलतोय. आम्हाला निधी मिळत नाही. आम्ही आमदार आहोत. पण आमच्या मतदारसंघातील विकासकामाचं भूमीपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री करतोय. आम्हाला निधी मिळत नाही. आम्हाला जरी निधी मिळाला तर तो थांबवण्याचा काम पालकमंत्री राष्ट्रवादीचा असल्याने ते करत असतात. अशा पद्धतीने आम्ही काम कसं करायचं, लोकांची कामे कसं करायची? विरोधात असतो तर सांगू शकलो असतो की आम्हाला निधी मिळत नाही. पण आज सत्तेत असूनही निधी मिळत नाही. सत्तेत असून कार्यकर्ता आणि जनतेला न्याय मिळवून देऊ शकत नसू तर या सत्तेचा काय फायदा? हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. पहिला शिवसंपर्क अभियान झाला तेव्हा आमची दिल्लीला बैठक झाली. आम्ही खरी परिस्थिती सांगितली. कार्यकर्त्याचा जीव आघाडीत घसमटतोय. कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्या, अशी विनंती केली", असं श्रीकांत यांनी सांगितलं. "साताऱ्यात साखर कारखाने खूप मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. आपल्या शिवसैनिकांचा ऊस घेऊन जायचा असेल तर त्यांना आधी विचारतात की, तू कुठल्या पक्षाचा आहे त्यानंतर त्यांचा ऊस विकला जातो. शिवसेनेचा असेल तर सर्वात शेवट. कुणाला शाखाप्रमुख पद दिलं तर त्याला पद सोडण्यासाठी दबाव देतात. या अडीच वर्षात इतका शिवसेनेत संघर्ष झालाय जो आतापर्यंतच्या इतिहासात कधीच झाला नव्हता. यावर विचार झाला पाहिजे होता. ठाण्यात कार्यकर्त्यांची गळचेपी कधी केली नाही. माझ्या मतदारसंघात नगरविकास विभागाचा निधी मिळत होता तेव्हा सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांना निधी दिला. ही असते आघाडी आणि हा असतो आघाडीचा धर्म", अशा शब्दात श्रीकांत यांनी राष्ट्रवादीला ठणकावलं. 'आमच्या नादी लागाल तर भारी पडेल', नरेश म्हस्केंचा इशारा "आमच्या नादी लागाल तर भारी पडेल. आतापर्यंत आम्ही संयम राखलेला आहे. ठाण्यात आज कोणत्याही पद्धतीत कोणाही विरोधात प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण आमच्यावर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आहेत. या नेत्यांच्या भांडणात आपल्याला भडकावलं जाईल. भरडले जाऊ नका. तुम्ही सर्वजण आपल्या नेत्याच्या विरोधात एकही चुकीची घोषणा करु नका. सर्व नेते आपले आहेत. आपण त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत", असं भाषण नरेश म्हस्के यांनी केलं. "एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाथ आम्ही सोबत आलेलो आहोत. पावसाने देखील त्यांना समर्थन दिलेलं आहे. आपण शिवसेनेसाठी लढतोय. ठाण्यात आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांनी तळागळ्यात पोहोचवले. आपले पालकमंत्रीच आपले पालनहार आहेत. आपल्या सगळ्या महिला आघाडीचं समर्थन एकनाथ शिंदे यांनाच राहील", अशी प्रतिक्रिया महिला आघाडीच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या