मुंबई, 14 ऑक्टोबर : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सायबर सेलनेही सायबर हल्याची शक्यता नाकारली नाही.
12 ऑक्टोबर रोजी मुंबईसह ठाणे आणि उपनगरात सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत सायबर हल्ला करण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असं म्हटलं आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत महाराष्ट्र सायबर सेल विभाग सुद्धा ऑडिट करणार आहे.
जून 2020 मध्ये जम्मू आणि काश्मिरच्या राज्य वीज नियंत्रण विभागाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला होता. या सायबर हल्ल्यातून महत्त्वाची माहिती चोरण्यात आली होती.
दरम्यान, मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यात घातपाताचा मोठा कट असू शकतो अशी शक्यता स्वत: ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही व्यक्त केली आहे. तांत्रिक बिघाडाला कोण जबाबदार आणि या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
विशेष म्हणजे, महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. त्यावेळी सर्व भार हा सर्किट दोनवर टाकण्यात आला होता. मात्र, सर्किट दोनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता' अशी माहिती सोमवारी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली होती. मात्र, आता राऊत यांनी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं ट्वीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.