Home /News /mumbai /

'जिभेची तलवारबाजी लोकं आता...' शिवसेनेचा संभाजीराजेंना सल्ला

'जिभेची तलवारबाजी लोकं आता...' शिवसेनेचा संभाजीराजेंना सल्ला

जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत.

    मुंबई, 12 ऑक्टोबर : 'जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल', असं म्हणत शिवसेनेनं भाजपचे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मराठा आरक्षण, अनलॉक आणि मंदिरं उघडण्याच्या मागणी करण्यावरून परखड भाष्य करण्यात आले आहे. 'प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.’ कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही' असा टोला शिवसेनेनं संभाजीराजेंना लगावला आहे. 'राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही. राज्यातील दोन घटनांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. पहिली घटना पिंपरी शहरातली आहे. पगारात भागत नसल्याने दोन उच्चशिक्षितांनी एटीएम मशीन फोडली व मोठी रक्कम लुटण्यात आली. दुसरी घटना नाशिकची आहे. सव्वादोनशे रुपये पगार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली. या दोन्ही घटना राज्यातील सध्याच्या स्थितीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. कोरोना व लॉक डाऊनचे हे ‘साइड इफेक्ट’ आहेत. लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांत गेल्या महिनाभरापासून वाढ झाली आहे. हे त्याचेच लक्षण आहे' अशी चिंताही सेनेनं व्यक्त केली. 'अद्यापि देव, मंदिरे, जिम, लोकल सेवा यांना स्थान मिळालेले नाही. ज्यांचा पुनश्च हरिओम झाला आहे, ते व्यवसायही पूर्णपणे उघडता आलेले नाहीत. रेस्टॉरंट, बार वगैरे उघडा, पन्नास टक्के क्षमतेने चालवा, असे सरकारने सुचवले; पण ते चालविताना पालिका, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांशी जो संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे धंदा करणेच नको अशी मानसिकता व्यावसायिकांत निर्माण झाली, असे दिसत आहे. आता अनलॉक काळात राज्यातील काही हजार उद्योग उघडल्याचे सांगितले जाते, पण त्याचा लाभ किती लोकांना झाला? जर पन्नासेक टक्के लोकांच्या क्षमतेने उद्योग सुरू झाले असतील तर उरलेल्या पन्नास टक्के लोकांच्या उपाशी पोटाची, त्यांच्या पोराबाळांची काय व्यवस्था सरकार करणार आहे? या गरीब लोकांच्या घरात जे किडूकमिडूक होते ते आता संपले. त्यामुळे एकतर आत्महत्या करणे नाहीतर गुन्हेगारीचा मार्ग पत्करून जिवंत राहणे, हाच मार्ग त्यांच्यासमोर आहे. सरकार यापैकी कोणत्या मार्गास मान्यता देणार आहे? ही जबाबदारी फक्त राज्यांची नाही तर केंद्राचीसुद्धा आहे हे आधी मान्य केले पाहिजे', अशी भूमिकाही सेनेनं मांडली. 'मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे', असा इशाराही सेनेनं दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: संभाजीराजे

    पुढील बातम्या