बेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप

बेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप

संप चिघळवण्यासाठी भाजपचे नेते कार्यरत असल्याचाही थेट आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : मुंबईत झालेल्या बेस्ट संपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि कामगार नेते शशांक राव यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. 'कर्मचाऱ्यांच्या मागण्यामध्ये भाजप आणि इतर काही घटकांनी तेल ओतलं', असा थेट आरोप शिवसेनेनं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

संप चिघळवण्यासाठी भाजपचे नेते कार्यरत असल्याचाही थेट आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. त्यामुळे बेस्टचा संप जरी मिटला असला तरी आता त्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे.

काय आहे सामनाचा अग्रेलख?

कामगारांची पोटे उपाशी राहिली तरी चालतील, पण कामगार नेत्यांची पोटे मात्र भरभरून फुगायला हवीत. अशा नौटंकीबाज नेत्यांत आता आणखी एकाची भर पडली आहे. पावसाळा आला की रस्त्यावरील गटाराच्या ‘मॅनहोल’मधून पूर्वी हमखास साथी जॉर्ज फर्नांडिस बाहेर पडत व ‘मी आलोय।SS’असे म्हणत भरपावसात म्युनिसिपल कामगारांना संप करायला लावून मुंबईकरांना वेठीस धरत असत. अर्थात कधी सुरू करायचे व कधी संपवायचे याचे भान जॉर्जसारख्या नेत्यांना होते.

भाई श्रीपाद अमृत डांगे हे मुंबईतील गिरणी कामगारांचे सगळ्यात मोठे नेते. त्यांनीही संप केले, पण तुटेपर्यंत ताणले नाही. कारण रोजगार मारून, घरावरून संपाचा नांगर फिरवून नेतृत्व करणाऱ्यांची जमात तेव्हा नव्हती. डॉ. दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांना संपाच्या खाईत ढकलले व माघारीचे सर्व दोर कापून कामगारांचे नुकसान केले. हा संप आजही सुरूच आहे, पण गिरणी कामगार संपला. जणू गिरणी मालकांना जे हवे होते तेच कामगार नेत्यांनी घडवून ‘मुंबई’चे मराठीपण संपवून टाकले.

आठ दिवसांपूर्वी ‘बेस्ट’चा संप ज्यांनी घडवला त्यांना पुन्हा एकदा ‘बेस्ट’ कामगारांचा गिरणी कामगार करायचा होता. उरलासुरला मराठी कामगार नष्ट केल्याचे पातक शिवसेनेच्या माथी मारून पडद्यामागे बसून ‘चांगभलं’ करायचे होते. त्यासाठी कट्टर शिवसेनाविरोधक एकत्र आले व एका रावास पुढे करून कामगारांना रंक करण्याचा डाव होता. ‘बेस्ट’ची आर्थिक अवस्था काय? व ती कोणामुळे? यावर आता तोंडाची डबडी वाजवली जात आहेत. पण हा कोसळत असलेला डोलारा सावरून कामगारांचे पगार चोख होतील व चुली विझणार नाहीत याची व्यवस्था ‘बेस्ट’ तोट्यात असतानाही शिवसेनेनेच केली आहे.

कामगारांना सत्य सांगा. नेतेपदाचा कंडू शमवण्यासाठी नको तेथे खाजवत बसू नका. संप करू नका हे न्यायालयाचे सांगणे होते व तोडगा काढू हीच आमची भूमिका होती. मराठी कामगारांच्या ताटात दोन घास जास्त पडणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. पण ते दोन घास देताना ताटाबरोबर पाटही कायमचा हातचा जाऊ नये हे पाहणेसुद्धा आमचे काम आहे. भारतीय जनता पक्षासह इतर काही मंडळी संपकऱ्यांच्या मागण्यांत तेल ओतत होते. कामगारांनो, शिवसेनेच्या नावानं शिमगा करा असे सांगत होते. हे सर्व करण्यापेक्षा राज्य सरकारने हजार- पाचशे कोटी रुपये ‘बेस्ट’ला टेकू लावण्यासाठी दिले असते तर कामगारांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या असत्या. मुंबईतून सालीना लाख-दोन लाख कोटी दिल्लीच्या तिजोरीत जातात ना? मुंबईस असे ओरबाडता ना? मग अशा प्रसंगी शे-पाचशे हजार कोटी रुपये भले अनुदान म्हणून द्यायला काय हरकत आहे? कामगारांना भरघोस अशी सात-आठ हजारांची पगारवाढ झाल्याची थाप मारून त्यांच्या नेत्यांनी संप मागे घेतला. यावर सत्य काय व खोटे काय ते पुढच्या पगाराच्या दिवशीच समजेल हे आम्ही आजच सांगत आहोत.

VIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला

First published: January 19, 2019, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading