'अच्छे दिन आणि सबका विकासच्या घोषणांचा पालापाचोळा'

'अच्छे दिन आणि सबका विकासच्या घोषणांचा पालापाचोळा'

'राज्यकर्त्यांना गदागदा हलवून एवढी भयंकर विषमता का? हा एका ओळीचा प्रश्न विचारायलाच हवा'

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : 'एक टक्का गर्भश्रीमंतांकडे देशातील निम्म्याहून अधिक संपत्ती आणि उर्वरित देशातील गरीबांच्या घरात मात्र अठराविश्वे दारिद्रय़ हे हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर केले. अच्छे दिन’ व ‘सबका साथ सबका विकास’ सारख्या घोषणा या अहवालासमोर पालापाचोळ्यासारख्या उडून जातात आणि राजशकट फक्त एक टक्का धनाढ्यांसाठीच हाकला जात आहे काय,' असा सवाल करत शिवसेनेनं मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

'हिंदुस्थानच्या समस्त जनतेने या अहवालावरून राज्यकर्त्यांना गदागदा हलवून एवढी भयंकर विषमता का? हा एका ओळीचा प्रश्न विचारायलाच हवा,' असं आवाहनही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केलं आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख?

हिंदुस्थान लवकरच आर्थिक महासत्ता होणार, अशी अफवा अधूनमधून पसरवली जात असते. केंद्रातील सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी आर्थिक क्षेत्रात देशाचा आलेख कसा झपाट्याने वाढतो आहे, असे बेटकुळ्या फुगवून सांगण्याची आपल्या देशात प्रथाच पडली आहे. या तथाकथित आर्थिक भरारीची कुठलीही फळे पदरात पडत नसल्यामुळे देशातील जनता मात्र असे फुसके आपटी बार फोडणाऱ्यांवर तीळमात्र विश्वास ठेवत नाही, हेही तितकेच खरे! आर्थिक विकासाचे आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीचे कितीही ढोल राज्यकर्ते बडवत असले तरी सत्य परिस्थिती मात्र नेमकी विपरीत आहे. ‘ऑक्सफॅम’ या आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठाप्राप्त संस्थेने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालाने ‘सबका विकास’ या दाव्याची पुरती पोलखोल झाली आहे. हिंदुस्थानातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमतेची दरी झपाट्याने वाढत असल्याचे भयंकर वास्तव जगासमोर ठेवणाऱ्या या अहवालातील नोंदी प्रत्येक संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. एकूणच जगाचे आणि हिंदुस्थानचेही नेमके चित्र मांडणाऱ्या या अहवालातून श्रीमंत आणि गरीब यांच्याविषयी जळजळीत वास्तव समोर आले आहे. हिंदुस्थानातील एकूण संपत्तीपैकी 51.53 टक्के इतका वाटा केवळ 1 टक्का लोकांकडे आहे. देशातील 10 टक्के लोकांकडे हिंदुस्थानातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के हिस्सा आहे, असे हा अहवाल सांगतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की, देशातील अवघ्या एक टक्का धनाढ्य लोकांच्या तिजोरीत देशातील निम्म्याहून अधिक संपत्ती पडून आहे. ही चक्रावून टाकणारी विषमता इथेच थांबत नाही. जो एक टक्का अतिश्रीमंत वर्ग आहे त्यांच्या संपत्तीमध्ये मागच्या वर्षभरात दररोज 2 हजार 200 कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे वर्षभरात हिंदुस्थानातील हे ‘कुबेर’ 39 टक्क्यांनी आणखी श्रीमंत झाले. याउलट आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जनतेच्या संपत्तीमध्ये मात्र केवळ 3 टक्क्यांची वाढ झाली, असे ‘ऑक्सफॅम’ने म्हटले आहे.  एका बाजूला एक टक्का धनवान आणि दुसऱ्या बाजूला दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेली गोरगरीब जनता अशी ही कमालीची विषमता आहे. गावखेड्यांत राहणाऱ्या, वाड्या-तांड्यांवर जगणाऱ्या आणि शहरी झोपडपट्ट्यांत आयुष्य कंठणाऱ्या सामान्य गरीब जनतेला भाकरीसाठी तर संघर्ष करावा लागतोच, पण आजारपण आणि त्यासाठी करावे लागणारे औषधोपचार यासाठीही अतोनात कसरत करावी लागते. एक टक्का लोकांकडे असलेले प्रचंड डबोले, 26 टक्के श्रीमंतांकडे असलेला अफाट पैसा आणि त्याच देशातील उर्वरित जनतेची अन्नानदशा अशी पराकोटीची दरी देशात निर्माण झालेली असतानाही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचा टेंभा आपण मिरवतो. ‘ऑक्सफॅम इंटरनॅशनल’ने नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. ‘एकीकडे एक टक्का धनाढ्य आणि दुसरीकडे उर्वरित गरीब जनता ही भयंकर विषमता हिंदुस्थानची सामाजिक रचना आणि लोकशाहीचा पाया ठिसूळ करणारी आहे’असा इशाराच ‘ऑक्सफॅम’ने आपल्या अहवालातून दिला आहे.

VIDEO : बुलडाण्यात भर दुपारी 'बर्निंग बस'चा थरार; थोडक्यात बचावले प्रवासी

First published: January 22, 2019, 7:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading