Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का झाले नाहीत? भाजपनेच त्यांचा घात केल्याचा शिवसेनेचा आरोप

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का झाले नाहीत? भाजपनेच त्यांचा घात केल्याचा शिवसेनेचा आरोप

महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे आणि हे सरकार वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू आहेत. अशात आता सामनाने पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांवर सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) निशाणा साधला आहे.

    मुंबई 26 जून : शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले आहेत. यानंतर राज्यात राजकीय भूकंप आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे आणि हे सरकार वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकनाथ शिंदे गट अद्याप तरी आपल्या निर्णयावर ठाम आहे. अशात आता सामनाने पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांवर सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) निशाणा साधला आहे. अग्रलेखात काय लिहिलं आहे? शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व श्री. शिंदे करीत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत, हे श्री. शिंदे यांनीच उघड केले. भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील ‘मेरिडियन’ हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ‘फुटीर’ आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली. शिवसेनेला मोठा झटका, नरेश म्हस्केंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा सुरतवरून हे बिऱहाड खास विमानाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था करण्याचे कारण काय? दुसरे महत्त्वाचे, बिऱ्हाड गुवाहाटीत पोहोचल्यावर काही आमदार मुंबईतून निघाले ते थेट गुवाहाटीला न जाता आधी सुरतला गेले. तिथून गुवाहाटीला गेले. ते रहस्य काय? सुरतच्या भूमीवर असा कोणता मंत्र या आमदारांना देण्यात आला? जे आमदार नंतर गुवाहाटीला गेले, त्यांनाही ‘व्हाया’ सुरत जावे लागले. हा संशोधनाचा विषय आहे. श्री. शिंदे हे शिवसेनेतील अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने श्री. शिंदे यांना फडणवीस काळात व ठाकरे सरकारात महत्त्वाची खाती दिली. नगरविकास खाते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. उद्धव ठाकरे यांनी ते शिंदेंकडे सोपवले. या खात्याचा पसारा व आर्थिक उलाढाल मोठी आहे. मुख्यमंत्री करण्याबाबत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा शब्द होता असे सांगितले जाते. त्यातून हे बंड झाले. मुख्यमंत्री पदाबाबत शब्द असू शकतो, पण भारतीय जनता पक्षाबरोबर झालेला ‘अडीच वर्षे’ मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपने मोडला. हा करार पार पडला असता तर श्री. शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी त्यांचेच नाव पुढे केले असते. शिंदे यांचा घात भाजपने केला. त्याच भाजपबरोबर श्री. शिंदे व त्यांच्या बरोबरच्या आमदारांना आता जायचे आहे. हे आश्चर्य आहे. श्री. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची गरज म्हणून. स्वतः शरद पवार व सोनिया गांधी यांनी त्यांना आग्रह केला व मुख्यमंत्रीपदी बसवले, पण शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटत आहे. 'विधानसभेला जाणारा रस्ता वरळीतूनच जातो', आदित्य ठाकरेंचं आतापर्यंतचं सर्वात आक्रमक भाषण शिवसेनेतून आज जे आमदार बाहेर पडले, त्यातले काही आमदार मूळ शिवसेनेचे नाहीत. अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले व मंत्रीही झाले. त्यांनी भाजप व हिंदुत्वाच्या गप्पा मारत सुरतमार्गे गुवाहाटी गाठावी हे गमतीचे आहे. तानाजी सावंत, सुहास कांदे हे फिरस्ते आहेत. ‘चाय तिकडला न्याय’ हे त्यांचे धोरण. असे अनेक जण आहेत. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, लता सोनवणे या आमदारांवर ईडी व जात पडताळणीसंदर्भात तलवारी लटकल्या होत्या. गुवाहाटीस जाण्यापूर्वी तूर्तास त्यांना अभय देण्यात आले. आता श्री. किरीट सोमय्या काय करणार? ‘‘माझ्या ईडीच्या सर्व केसेस क्लीअर झाल्या. मी सुटलो. त्यामुळे मी भाजप सांगेल ते करतोय,’’ असे सांगून ठाण्याचे एक आमदार सुरतला गेले. पाठोपाठ यामिनी जाधव, लता सोनवणे पोहोचल्या. गुलाबराव पाटील हे स्वतःस शिवसेनेचा वाघ वगैरे म्हणवून घेतात. पान टपरीवरल्या सामान्य शिवसैनिकास शिवसेनेने आमदार व कॅबिनेट मंत्री कसे केले याची वीरश्रीयुक्त कथने जाहीर सभांतून करतात, पण तेच गुलाबराव पाटील यांना कोणीतरी ईडी कारवाईची पोकळ धमकी देताच ते पळून गेले. संदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. शिवसैनिकांच्या मेहनतीने ते सतत विजयी झाले. आज ठाकरे सरकारात ते कॅबिनेट मंत्री झाले. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे 30 वर्षे सत्तेत आहे व वेळ येताच पळून गेला. दादा भुसेंपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपचा जाच होता व आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय. भारतीय लोकशाहीचे घाणेरडे चित्र आधी मध्य प्रदेशात दिसले व आता महाराष्ट्रात दिसत आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या बावीस आमदारांनी राजीनामा दिला व ते निवडणुकांना सामोरे गेले. महाराष्ट्रात शिवसेनेने दिलेल्या आमदारकीसह लोक पळून गेले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा लोकांचा कौल घेतला पाहिजे. आमदारांना या राज्यातून त्या राज्यात व या हॉटेलातून त्या हॉटेलात पळवत ठेवणे ही कसली लोकशाही? 40 आमदार व त्यांच्या नेत्यांना मुंबईत थांबूनही त्यांची भूमिका मांडता आली असती व महाराष्ट्रातील अनेकांना ज्या प्रकारे केंद्राने सुरक्षा पुरवली, तशी सुरक्षा या आमदारांना भाजपने पुरवलीच असती, पण आमदारांना पळवले जात आहे. चार्टर्ड विमाने, गाडय़ा, हॉटेल्स यावर अमर्याद खर्च लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली सुरू आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, शिवसेना सोडून छगन भुजबळ व नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. श्री. एकनाथ शिंदे तरी होतील काय? शिवसेनेत राहूनच ते मुख्यमंत्री होण्याची खात्री जास्त होती. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्या बरोबर आहे. या आकडय़ांत पैशाला चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ‘ईडी’च्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या श्री. शिंदे यांना सोडूनही पळ काढतील. बंडखोरीचा इतिहास तेच सांगतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या