22 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार येईल की नाही, याबद्दल स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपला अंदाज वर्तवला आहे. 'केंद्रात भाजपच्या 200 जागा येतील', असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसंच 'शिवसेनाला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचायला पाहिजे. शिवसेनासारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही. सेना सत्तेतून बाहेर पडत नाही. त्यांना किक मारूनच बाहेर काढावे लागणार आहे अन्यथा ते बाहेर पडणार नाही', अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली.
न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये नारायण राणे यांनी सडेतोड मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सेनेवर घणाघाती प्रहार केला. 'भाजप आणि शिवसेनेनं युती केली तर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र्य लढणार आहे', अशी घोषणाच राणेंनी केली.
केंद्रात भाजपला २०० जागा मिळतील
आगामी निवडणुकीत भाजप सरकार सत्तेत येण्याबद्दल नारायण राणे यांनी आपलं भाकित वर्तवलं आहे. 'निकाल वेगळे असू शकतात. महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. निकाल बदलू शकतो. केंद्रात भाजपचे सरकार येईल. पण, ते बहुमतात असेल की नाही, हे सांगू शकत नाही. भाजपच्या 200 पर्यंत जागा येतील', असा अंदाज नारायण राणे यांनी वर्तवला आहे.
मुलाची केली पाठराखण
माझ्या मुलाने जे बोललं ते चुकीचं नाही. माझ्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक आरोप केले. त्यामुळे माझ्या मुलाला राग येणे साहजिकच आहे. त्याने ज्या भाषेत उत्तर दिले ते कुणीही देऊ शकतं. शेवटी तो राणेंचा मुलगा आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी निलेश राणे यांची जोरदार पाठराखण केली. परंतु, आनंद दिघे यांच्या प्रकरणावर तुमचं काय मतं आहे? असा सवाल केला, असता त्यांनी याबद्दल बोलण्यास नकार दिला.
'तिन्ही राणे एकाच पक्षात येणार'
नारायण राणे यांना आज सर्वच पक्षाकडून मागणी आहे. लवकरच एकाच पक्षात तिन्ही राणे एकत्र येतील, असं सांगत त्यांनी नितेश आणि निलेश राणे यांच्याबद्दल निवडणूक लढवण्याबद्दल संकेत दिले आहे.
'ठाकरे सिनेमा घरीच पाहणार'
सिनेमा हा सिनेमा असतो, तो आनंदासाठी बघायचा असतो. साहेबांचा सिनेमा हा मी घरीच पाहणार आहे. माझ्या घरीच थिएटर आहे. परंतु, या चित्रपटामुळे साहेबांची प्रतिमा घराघरात पोहोचणार, असंही ते म्हणाले.
===================================