Home /News /mumbai /

...मग पंजाबच्या शेतकऱ्यांना थंडीत रस्त्यावर उभे का केले? सेनेचा मोदींना सवाल

...मग पंजाबच्या शेतकऱ्यांना थंडीत रस्त्यावर उभे का केले? सेनेचा मोदींना सवाल

पंतप्रधान मोदी यांनी गुरू तेगबहादूर यांच्याकडून प्रेरणा घेतली. आनंद आहे. दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीख लढवय्येसुद्धा त्याच प्रेरणेतून लढत आहेत. त्यामुळे लढाईचा अंत काय?

    मुंबई, 22 डिसेंबर :  ‘प्राण जाए पर वचन न जाए, सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं’, असा बाणा औरंगजेबाला दाखवणारे गुरू तेगबहादूर हे छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच धर्मवीर ठरले. त्यामुळे शिखांच्या शेतकरी आंदोलनाकडे (Farmer Protest) पाठ फिरवून मोदी गुरुद्वारा रकीबगंज ( Pm Narendra Modi visit to Sikh shrine Gurudwara Rakabganj ) येथे पोहोचले, तरी दिल्लीच्या सीमेवरील पंजाबचा शेतकरी विचलित झाला नाही. त्याचा संघर्ष, त्याचा लढा सुरूच राहिला. पंतप्रधान मोदी यांनी गुरू तेगबहादूर यांच्याकडून प्रेरणा घेतली. आनंद आहे. दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीख लढवय्येसुद्धा त्याच प्रेरणेतून लढत आहेत. त्यामुळे लढाईचा अंत काय? असा परखड सवाल शिवसेनेनं (Shivsena) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'दिल्लीतील रकीबगंज गुरुद्वारात पंतप्रधान मोदी अचानक गेले. गुरू तेगबहादूर यांच्या समाधीपुढे त्यांनी माथे टेकवले. यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? मोदी यांनी कोणतीही कृती केली तरी ते नाटक किंवा ढोंगच आहे, असे मानून विरोधक टीका करतात. हे काही योग्य नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अनेकदा मंदिर, मशीद, गुरुद्वारात गेल्याच आहेत. ईदचा शिरकुर्मा आणि बिर्याणी तर अनेकांनी चापली आहे, पण मोदी यांच्याबाबतीत विरोधक वेगळी भूमिका घेतात याचे आश्चर्य वाटते' असं म्हणत शिवसेनेनं मोदींना टोला लगावला आहे. 'गेल्या एक महिन्यापासून पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतो आहे. हा शेतकरी ‘शीख’ म्हणजे लढवय्या समाज आहे. देशाच्या रक्षणासाठी शिखांचे योगदान मोठे आहे. अशा शिखांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू असतानाच पंतप्रधान रकीबगंज गुरुद्वारात अत्यंत साधेपणाने गेले.  पंतप्रधान मोदी यांनी गुरुद्वारा भेटीतून शिखांचे मन जिंकण्याचा प्रयोग केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबचा शीख समुदाय नाराज आहे. तो मोदींविरोधी घोषणा देत आहे. या पंजाबच्या शेतकऱ्यांना अतिरेकी, खलिस्तानी वगैरे ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भडकलेल्या शिखांच्या भावनांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न मोदींनी केला, असे आता म्हटले जात आहे. शिवाय, मोदी गुरुद्वारात गेले त्यामागे राजकारण आहे. शिखांविषयी इतकेच प्रेम होते तर पंजाबच्या शेतकऱ्यांना एक महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर का उभे केले आहे? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला. 'मोदी हे अचानक रकीबगंज गुरुद्वारात पोहोचले. त्याच वेळी तेथे जी ‘गुरुवाणी’ सुरू होती, त्याचा थोडक्यात सारांश असा तुम्ही सेवा करता. ईश्वराची भक्ती करता. करीतही असाल, पण तुमचे विचार बदलले नाहीत तर त्या सेवेचा, भक्तीचा काय उपयोग? तुम्ही धर्मग्रंथांची अनेक पारायणे केली, परंतु त्यातील उपदेश, शिकवणूक तुम्ही समजून घेतली नाही, त्याचा अंगीकार मानवतेच्या कल्याणासाठी केलाच नाही तर धर्मग्रंथांच्या त्या पारायणांचा काय उपयोग? अशा वेळी जेव्हा तुमची ‘वेळ’ येईल, तुमच्या कर्मांचा ‘हिशोब’ होईल त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठे तोंड लपविणार? काळापासून कोणीही स्वतःचा बचाव करू शकलेले नाही आणि करू शकणार नाही, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा, असं सांगत सेनेनं मोदींना टोला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या