Home /News /mumbai /

'भारत बंद हे सरकारपुरस्कृत अराजकाला चोख उत्तर', सेनेचा मोदी सरकारवर निशाणा

'भारत बंद हे सरकारपुरस्कृत अराजकाला चोख उत्तर', सेनेचा मोदी सरकारवर निशाणा

'देशावर सतत भय-दहशतीची टांगती तलवार ठेवून आम्हीच तुमचे तारणहार आहोत, असा प्रचार करून राजकीय फायदा मिळवायचा. यालासुद्धा अराजकच म्हणावे लागेल.'

    मुंबई, 9 डिसेंबर : 'देशावर सतत भय-दहशतीची टांगती तलवार ठेवून आम्हीच तुमचे तारणहार आहोत, असा प्रचार करून राजकीय फायदा मिळवायचा. यालासुद्धा अराजकच म्हणावे लागेल.  देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो असाच भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे. गोबेल्सचे बाप भाजपच्या सायबर फौजांचे सेनापती आहेत. माध्यमे व यंत्रणांवर त्यांचा कब्जा आहे. तरीही शेतकरी आंदोलन (Farmer Protest) त्यांना थांबविता आले नाही व देशव्यापी बंद झाला. सरकारपुरस्कृत अराजकाला हे चोख उत्तर आहे' अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) मोदी सरकारवर (Modi Government)सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्यानिमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. 'भारतीय जनता पक्ष ज्यांना अतिरेकी आणि खलिस्तानी ठरवत आहे, अशा पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांनी ‘हिंदुस्थान बंद’चा पुकार केला, तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. बंद यशस्वी झाला, हे सत्य मोदी सरकार किंवा भाजप प्रवक्त्यांना पचनी पडणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचा हा उद्रेक आहे. ज्याला सरकारचे लोक कृषी सुधारणा कायदा म्हणत आहेत तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा कायदा आहे. या काळ्या कायद्यास विरोध करणे म्हणजे देशात अराजक माजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपचे पुढारी करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. शेतकरी आंदोलन करतात. आपल्या मागण्या मांडण्यासाठी संघर्ष करीत रस्त्यावर उतरतात हे अराजक आहे, असे सरकार पक्षाला वाटू लागते तेव्हा मागच्या दाराने हुकूमशाही वाट चालत आहे, याची खात्री बाळगा" अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली. 'शेतकऱ्यांचे म्हणणे समजून घ्या. त्यांच्या मागण्या मान्य करा असेच विरोधकांचे म्हणणे आहे, पण विरोधकांनी शेतकऱ्यांची बाजू घेणे म्हणजे अराजक माजविण्याचा प्रयत्न, असा नवा शोध सरकार पक्षाने लावला. बंद पुकारला आहे तो शेतकरी संघटनांनी. त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. विरोधकांनी फक्त शेतकऱ्यांना पाठिंबा दिला, यात काय चुकले? वास्तविक, भारतीय जनता पक्षाने सध्या प. बंगालात जो राजकीय गोंधळ घातला आहे, हजारो लोक रस्त्यावर उतरवून थयथयाट चालविला आहे, जातीय, धार्मिक उन्माद चालविला आहे, रक्तपात आणि हिंसाचार घडविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यालाच खरे तर अराजक हा शब्द लागू पडतो. ही एवढी ताकद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लावली असती तर थंडी-वाऱ्यात रस्त्यावर बसलेला शेतकरी आपापल्या घरी सुखरूप गेला असता, पण सरकारलाच अराजक हवे आहे. अराजकाच्या शेकोटीवर त्यांना राजकीय भाकऱ्या शेकायच्या आहेत.' असा आरोपही सेनेनं मोदी सरकारवर केला आहे. 'परदेशी राष्ट्रप्रमुखांनीही हिंदुस्थानातील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी ‘कॅनडा हा शांततेने आंदोलन करणाऱयांच्या हक्काच्या बाजूने आहे,’ असे सांगत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 36 ब्रिटिश खासदारांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आणि प्रवक्ते अँटोनिओ गुटेरस यांनी ‘लोकांना शांततेने आंदोलन करण्याचा हक्क आहे,’ असे भाष्य केले होते. कॅनडाचे पंतप्रधान आणि इतर लोक हिंदुस्थानात अराजक घडवू पाहत आहेत काय?' असा सवालही सेनेनं थेट मोदी सरकारला विचारला आहे. 'आंदोलनाच्या समर्थनासाठी पंजाबमधील खेळाडू, कलाकार एकवटले. त्यातले अनेक जण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत. आता हे सर्व खेळाडू अतिरेक्यांना मदत करीत आहेत, अराजक घडवीत आहेत, असे म्हणायचे का? शेतकऱ्यांच्या आंदोलनास चीन व पाकिस्तानची फूस तर आहेच, पण त्यांच्याकडून अर्थपुरवठाही होत असल्याची फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली' असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या