नितीशकुमारांना मुख्यमंत्रिपदी लादणे हा लोकमताचा अवमान, सेनेचं टीकास्त्र

नितीशकुमारांना मुख्यमंत्रिपदी लादणे हा लोकमताचा अवमान, सेनेचं टीकास्त्र

'बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला'

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर :  'बिहारमध्ये (bihar assembly election 2020) भाजप (BJP) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशकुमार (NitishKumar) व त्यांचा पक्ष कुठेच नाही. मुख्यमंत्री  (Bihar CM)म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रिपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल' अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) थेट नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून बिहार निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचं पुन्हा एकदा कौतुक करण्यात आले असून भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

'तेजस्वी यादव या जिद्दी नेत्याची प्रतिमा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत तावून सुलाखून निघाली. तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे' असं म्हणत तेजस्वी यादव यांचे कौतुक करण्यात आले आहे.

'बिहारची सूत्रं अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकड्यांच्या खेळात ‘एनडीए’ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांचा विजय किती निसरडा आहे ते समजून घ्या. तेजस्वी यादव यांच्या आघाडीस 110 जागा मिळाल्या. त्यांच्या आठ जागा 100 ते 300 च्या फरकाने पराभूत झाल्या. काही तर मतदारसंघांत मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यांत गोंधळ घालून ‘जागा’ लाटल्या, असा आरोप तेजस्वी यांच्या पक्षाने केला. ‘राजद’ने 119 विजयी उमेदवारांची यादीच घोषित केली. पण निवडणूक अधिकारी नितीशकुमारांच्या सूचनांचे पालन करीत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. त्यातले सत्य काय ते नितीशबाबूंनाच माहीत' असा टोलाही सेनेनं लगावला.

'जनता दल युनायटेड पक्षाला लोकांनी धूळ चारली आहे. भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल. ओवेसी हे मोदी किंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारातही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान 15 उमेदवार पराभूत झाले. या 15 जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यादव यांची घोडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली' असंही सेनेनं म्हटलं आहे.

'बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली. आता काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. खुर्चीवर नितीशकुमारांना बसवून ‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील' असा टोलाही सेनेनं लगावला.

Published by: sachin Salve
First published: November 12, 2020, 8:52 AM IST

ताज्या बातम्या