Home /News /mumbai /

...हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान, शिवसेनेनं आठवलेंना 'नग' म्हणून सुनावले

...हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान, शिवसेनेनं आठवलेंना 'नग' म्हणून सुनावले

'पाण्यात राहून माशाशी वैर केले नाही किंवा स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यांच्या घरावर दगड मारले नाहीत. ज्यांनी ते मारले ते मुंबई-महाराष्ट्राच्या शापाचे धनी ठरले'

      मुंबई, 12 सप्टेंबर : 'डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टयांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळय़ात मोठा अवमान आहे' असं म्हणत शिवसेनेनं भाजप आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून कंगना राणावतला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या भाजप आणि रिपाइं पक्षावर टीका केली आहे. 'मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळ्या वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते.' असं म्हणत शिवसेनेनं सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधला. 'राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला?' असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले. मात्र डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टयांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान. डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रद्वेष्ट्या मंडळींबरोबर खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा 106 हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते.' अशी टीका शिवसेनेनं रामदास आठवले यांचे नाव न घेता केली. 'बॉलीवूड नामक हिंदी सिनेसृष्टीचा ‘तंबू’ मुंबईत रुजला व एक उद्योग म्हणून तो फोफावला. मुंबईचा फिल्मी उद्योग आज लाखोंना रोजीरोटी देत आहे. सध्या येथे ‘खानावळ’ आहे अशी टीका होते. तशी कधी मराठी, तर कधी पंजाबी मंडळींची चलती होतीच. पण मधुबाला, मीनाकुमारी, दिलीप कुमार, संजय खानसारख्या दिग्गज मुसलमान कलावंतांनी पडद्यावरील आपली नावे ‘हिंदू’ केली. कारण तेव्हा येथे धर्म शिरला नव्हता, तर कला-अभिनयाचेच नाणे खणखणीतपणे वाजवले जात होते. घराणेशाहीचे वर्चस्व आज आहेच. तसे तेव्हाही होतेच. कपूर, रोशन, दत्त, शांताराम अशा खानदानांतून पुढची पिढी समोर आली आहे, पण जे उत्तम काम करत होते तेच टिकले. मुंबईने फक्त गुणवत्तेचा गौरव केला. राजेश खन्नाला कोणतेच घराणे नव्हते. जितेंद्र, धर्मेंद्रलाही नव्हते. पण त्यांच्या मुला-नातवांना ते घराणे असेल तर बोटे का मोडायची?  पाण्यात राहून माशाशी वैर केले नाही किंवा स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यांच्या घरावर दगड मारले नाहीत. ज्यांनी ते मारले ते मुंबई-महाराष्ट्राच्या शापाचे धनी ठरले', असं म्हणत कंगना राणावतला खडेबोल सुनावले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या