ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? सेनेचा फडणवीसांना सणसणीत टोला

ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? सेनेचा फडणवीसांना सणसणीत टोला

चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जुलै : 'राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद आहेत. वादाचे रूपांतर वादळात होईल अशी रिपरिप गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे.  पण शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?' असं म्हणत शिवसेनेनं भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात 'अंतर्विरोधाच्या चिपळ्या!' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात भाजपवर सडकडून टीका करण्यात आली.

 

'सरकारमधील तीन प्रमुख पक्षांचे अजिबात पटत नाही व अनेक निर्णयांवर मतभेद आहेत. त्यामुळे श्री. शरद पवार हे शिष्टाई करण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. तीन पक्षांत समन्वयाचा अभाव असून पडद्यामागे बरेच काही सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळय़ा रिपरिप बातम्यांत काडीमात्र तथ्य नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार? शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सहकार क्षेत्रातले प्रश्न घेऊन  पवार हे मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटतात. त्यास जर कोणी ‘शिष्टाई’, ‘मध्यस्थी’ वगैरे शब्दांचे अलंकार लावीत असतील तर ते अलंकार त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत. मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला व त्या बदल्यांतून अविश्वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही व त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले, असे सांगणे व छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे' असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.

गाईसोबत अतिप्रसंग करत होता 55 वर्षीय इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

'दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे एक धाडसी, कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यामुळे रिपरिप बातम्यांच्या माध्यमांतून त्यांच्यावर नाहक टीका करण्याचे कारण नाही. विरोधक तसे करीत असतील तर ते क्षुद्र पातळीचे राजकारण ठरेल' अशी टीकाही शिवसेनेनं केली.

देवेंद्र फडणवीस यांची गाडी विरोधी पक्षनेता म्हणून रुळावर येताना दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वास्तव त्यांचे मन अशांत करणारे असले तरी त्यांनी ते अखेर स्वीकारले हे बरे झाले.  फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही आणि हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही. हे सरकार अंतर्गत विरोधातूनच पडेल, असे विरोधी पक्षनेते सांगतात. विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की, सरकार पाडण्याची घाई नाही, पण सरकार अंतर्गत विरोधातून पडेल असा गोंधळी विचार त्यांनी मांडला आहे. चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे.' असा टोलाही फडणवीसांना लगावला आहे.

'राजगृह' तोडफोड प्रकरणी फडणवीसांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे केली मागणी

सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ श्री. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळय़ा वाजवायची वेळ आहे का? असा सवालही सेनेनं केला.

'देशात व राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. चीनने तात्पुरती माघार घेतली असली तरी कोरोनाची पीछेहाट झालेली नाही. कोरोना हे देशावरील संकट आहे. त्यामुळे या लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये. विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते. त्यांना काही चुकीचे किंवा धूसर दिसत असेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करणे व चष्म्याचा नंबर बदलून घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे व त्याबाबत विरोधी पक्षाने हेळसांड करू नये. चांगल्या विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे व फडणवीस, दरेकर हे विधिमंडळातले दोन्ही विरोधी पक्षनेते आता त्यांच्या पद्धतीने चांगले काम करीत आहेत. पदाची प्रतिष्ठा त्यांनी राखावी इतकीच माफक अपेक्षा' असा सल्लावजा टोलाही फडणवीसांना लगावला.

Published by: sachin Salve
First published: July 8, 2020, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading