मुंबई, 2 डिसेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटीबाबत केलेल्या मुंबई दौऱ्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच दौऱ्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तिरकस शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
'भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटले होते. त्यामुळे त्यांनी हे स्पष्ट केले पाहिजे की, योगीजी मुंबईत आले आहेत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये, कारण ती नटी म्हणते हे PoK आहे. मुंबई देशाचं पोट भरते, शेवटी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाही इथे यावे लागते, हा मुंबईचा गौरव आहे,' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
'मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, पण मुंबईच्या धर्तीवर जर कोणी विकास करत असेल, उत्तर प्रदेश सारख्या मागास राज्याचा विकास होणार असेल, तिथे रोजगार निर्मिती होणार असेल, तर आम्ही स्वागत करतो. कारण मुंबईवरील ताण कमी होईल, त्यासंदर्भात योगीजींना मदत लागली तर आम्ही नक्की करू,' असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी राज्यपालांनाही काढला चिमटा
मंत्रिमंडळाने नावं सूचवल्यानंतरही राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर बोलताना संजय राऊत यांनी उपरोधिक शैलीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. 'राज्याच्या कॅबिनेटने दिलेला प्रस्ताव राज्यपालांना मंजूर करावा लागेल, मला वाटत नाही राज्यपाल कोणते घटनेच्या विरोधात काम करतील. थोडा उशीर होईल, कारण 12 नावांचा तो अभ्यास असतो, इतका महान अभ्यास असतो, त्यामुळे उशीर होईल पण नक्की सही करतील,' असं संजय राऊत म्हणाले.