मुंबई, 30 मे: '‘टुलकिट’ (toolkit) म्हणजे काय? ते सामान्य जनतेला माहीत नाही, पण त्या ‘टुलकिट’ने मोदी सरकारला नक्कीच अस्वस्थ केले. आता समाजमाध्यमांवर बंदी (social media ban in India) घालण्याचा विचार मोदींचे सरकार करीत आहे. याच समाजमाध्यमांचा वापर करून 2014 आणि 2019 च्या निवडणुका मोदी (Narendra Modi) व भाजपने (BJP) जिंकल्या. आता ‘टुलकिट’ उलटले आहे' असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला आहे. तसंच, यालाच म्हणतात, ‘कालाय तस्मै नमः’ उत्तर कोरियातील हुकूमशहा किंम जोंग याने त्याच्या देशात ‘ट्विटर’ वगैरेंवर बंदीच घातली. चीनसारख्या राष्ट्रातही ते नाहे. आता मोदींच्या देशातही ‘सोशल माध्यमां’वर बंदी येत आहे' अशी तुलनाच राऊत यांनी केली.
सोशल मीडियावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला.
पुण्यात फार्महाऊसवर डान्सबार, दिवसाढवळ्या सुरु होता धांगडधिंगा
'फेसबुक, ट्विटर, यू टय़ूबवर बदनामीच्या मोहिमा राबवायच्या. हे तंत्र आता गोबेल्सच्याही पुढे गेले. त्याचा सगळय़ात जास्त गैरवापर भाजपने केला हे सत्य आहेच, पण त्यावर नियंत्रण हवे, असे आता देशातील मोदी भक्तांना वाटू लागले हे आश्चर्यच आहे. 2014 पासून 2019 पर्यंत याच माध्यमांचा वापर करून भारतीय जनता पक्षाने विरोधकांना नामोहरम केले. डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर यथेच्छ चिखलफेक करण्यासाठी याच माध्यमांचा वापर केला. आज त्याच माध्यमांचे ‘टुलकिट’ भाजपवर उलटले आहे व सोशल मीडियावर ‘बंदी’ घालण्याची हालचाल केंद्र सरकारने सुरू केली. ट्विटर, फेसबुकवर नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची ‘कोरोना’ हाताळणीसंदर्भात बदनामी होत आहे, असे सांगणे म्हणजे काळाने त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे' अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.
'डॉ. मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ व राहुल गांधी यांना ‘पप्पू’ ठरविण्यासाठी 2014 साली भाजपने याच माध्यमांचा वापर केला. आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली, वृत्तपत्रांवर बंधने आणली, अग्रलेखांवर चौकी, पहारे बसविले. स्पष्ट बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबले. त्याच इंदिरा गांधींना पराभवानंतर शहा कमिशनसमोर जाण्याची वेळ आली. ज्यांनी आणीबाणी जाहीर करून सर्वांचे व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट केले (असा विरोधकांचा आरोप) त्यांनाच व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यावर आपले समर्थन करणे आणि शहा आयोगावर आक्षेप घेणे भाग पडावे ही दैवाची विचित्र लीलाच होती. तेच दैव भाजपच्या नशिबी आले. भाजपने ट्विटर, टुलकिट वगैरेंबाबत उपस्थित केलेले मुद्दे चुकीचे आहेत असे नाहीत. प्रत्येकाची प्रतिष्ठा हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असतोच. प्रश्न एवढाच उरतो की, भाजप पुढाऱ्यांनी हा युक्तिवाद करणे हे त्यांच्या पूर्वीच्या कृतीशी सुसंगत नाही असे कोणाला वाटले तर त्याला दोष देता येणार नाही' असंही राऊत म्हणाले.
कुत्र्यांमार्फत माणसांमध्ये आलेला Canine Coronavirus व्यक्ती-व्यक्तीमध्ये पसरतो?
'काँग्रेस पक्ष पंतप्रधान मोदी यांच्या बदनामीसाठी पद्धतशीर मोहीम राबवत असल्याचे भाजपने सांगितले. प्रश्न इतकाच आहे की, ‘ट्विटर’वरून मोदी सरकारची बदनामी झाली. मोदी सरकार कोविड संकट हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेय हे सोशल मीडियावर सतत ठोकून सांगण्यात आले व त्यामागे काँग्रेस आहे असे सांगणे हे मूर्खाचे लक्षण आहे. गंगेत प्रेते तरंगत आहेत. त्या प्रेतांचे फोटो व देशभरात पेटलेल्या चितांचे भडाग्नी जागतिक मीडियाने दाखवले. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टावर खर्च करण्यापेक्षा तो निधी कोविड, लसीकरणावर खर्च व्हावा ही मागणी जनतेची आहे. त्यांनी ‘ट्विटर’सारख्या माध्यमांचा वापर व्यक्त होण्यासाठी केला. म्हणून दिल्लीतील ‘ट्विटर’ इंडियाच्या कार्यालयावर दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री धाडी टाकल्या. मुळात काँग्रेस व भाजपमधील लढाई ही कोविड संकट हाताळणीवरून आहे व भाजपचे लोक समाजमाध्यमांवर येऊन जी सारवासारव करत आहेत त्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही. कारण त्यांना गंगेतला प्रेतांचा प्रवाह, लसीकरणातला गोंधळ स्पष्ट दिसतो. त्यामुळे ‘खोटे’ स्वीकारण्याची मर्यादा संपली आहे' असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Shivsena, Social media viral