काश्मीरमध्ये तिरंगा फडकवता येत नसेल तर काय उपयोग? राऊतांचा थेट मोदी सरकारला सवाल

काश्मीरमध्ये तिरंगा फडकवता येत नसेल तर काय उपयोग? राऊतांचा थेट मोदी सरकारला सवाल

'काश्मीर खोऱ्यातून 40,000 काश्मिरी पंडितांनी पलायन केले. त्यांची ‘घरवापसी’ करू व 370 कलम हटवल्यावर पंडितांना त्यांच्या घरी सहज जाता येईल असा ‘प्रपोगंडा’ केला गेला. तो चुकीचा आहे.'

  • Share this:

मुंबई, 01 नोव्हेंबर :  'काश्मीर (kashmir) हा फक्त आपल्यासाठी एक जमिनीचा तुकडा नाही, त्याहीपेक्षा बरेच काही आहे. आता तिकडे जमिनी वगैरे खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चार दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या (Shrinagar) लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकड्यांचा उपयोग काय?' असा रोखठोक सवाल शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मोदी सरकारला विचारला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून 370 कलम आणि काश्मीरमधील वातावरणावर भाष्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘35 अ’ कलम संपवले. लडाखला जम्मू-काश्मीरपासून तोडून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला. या घटनेस एक वर्ष झाल्यावर आता जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरच्या लोकांना जमीन खरेदीस केंद्राने परवानगी दिली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगत होते. पुन्हा तेथील राजकीय पक्षांचा दोन दगडांवर पाय. त्यातला एक पाय पाकिस्तानात. हिंदुस्थानच्या केंद्रीय सरकारने मनासारखे केले नाही तर पाकिस्तानप्रेमाचे तुणतुणे वाजवून ‘ब्लॅकमेल’ करायचे हे आतापर्यंत चालले. ते काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र 370 कलम हटवल्यावर काश्मीरातील परिस्थिती सुरळीत होईल असे काही झाले नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही कश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे, असं परखड मत राऊत यांनी व्यक्त केले.

'काश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले. असे ‘प्रयोग’ अटलबिहारी वाजपेयी यांनीही केले. लाहोरला ते बस घेऊन गेले. मुशर्रफबरोबर आग्रा येथे परिषद घेतली. हा प्रयोगच होता. मोदी-शहा यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपचे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये बनवले. ते कशासाठी? याकडेही एक शांतता राखण्याचा ‘प्रयोग’ म्हणूनच पाहायला हवे. मेहबुबा मुफ्ती व त्यांचा पक्ष सरळ आझाद काश्मीरच्या बाजूने आहे. जोपर्यंत पुन्हा 370 कलम काश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत काश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱ्या मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे. किंबहुना त्यांची रवानगी अंदमानच्या कारागृहात करायला हवी एवढा त्यांचा अपराध भयंकर आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी तर हिंदुस्थानच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे' असंही राऊत म्हणाले.

'काश्मीर खोऱ्यातून 40,000 काश्मिरी पंडितांनी पलायन केले. त्यांची ‘घरवापसी’ करू व 370 कलम हटवल्यावर पंडितांना त्यांच्या घरी सहज जाता येईल असा ‘प्रपोगंडा’ केला गेला. तो चुकीचा आहे. एकही कश्मिरी पंडित अद्याप कश्मीर खोऱ्यात परतू शकला नाही. ‘जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है.’ ही घोषणा प्रेरणादायी आहे. पाकिस्तानप्रेमींना काश्मीरातून उखडून फेकले पाहिजे. पण पाकिस्तानचा विषय हा देशातील निवडणुकांत तोंडी लावण्याचा विषय आहे. कश्मीर हा फक्त आपल्यासाठी एक जमिनीचा तुकडा नाही, त्याहीपेक्षा बरेच काही आहे' असं मतही राऊत यांनी व्यक्त केले.

Published by: sachin Salve
First published: November 1, 2020, 9:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या