Home /News /mumbai /

मोठी बातमी : ED चौकशीनंतर भाजपने ऑफर दिली का? प्रताप सरनाईकांनी केला खुलासा

मोठी बातमी : ED चौकशीनंतर भाजपने ऑफर दिली का? प्रताप सरनाईकांनी केला खुलासा

ईडी चौकशीवरून प्रताप सरनाईक यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई, 8 डिसेंबर : शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांनी सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतलं आहे. यावेळी सरनाईक यांनी ईडीकडून होणाऱ्या चौकशीबाबतही आक्रमक भाष्य केलं आहे. 'ही लढाई एकट्या प्रताप सरनाईकची नाही. ही लढाई संपूर्ण महाविकास आघाडीची आहे. त्यामुळे फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मला पाठिंबा असल्याचा विश्वास दिला आहे,' असं प्रताप सरनाईक म्हणाले. 'माझ्यावर आरोपपत्र दाखल झालेलं नाही. एका फिर्यादीने माझं नाव घेतल्याने मला ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. मी पळून जाणारा नाही. ईडीकडून जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल, तेव्हा मी नक्की जाणार आहे. मी काहीही गुन्हा केलेला नाही. मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे आज मी उभा आहे,' असं म्हणत सरनाईक यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या नेत्यांनी ऑफर दिली? ईडी चौकशीनंतर तुम्हाला भाजपच्या नेत्यांनी संपर्क केल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांकडून प्रताप सरनाईक यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, 'राज्यात पुढची पाच नव्हे तर 25 वर्ष महाविकास आघाडीचंच सरकार राहणार नाही. मला कोणीही कितीही ऑफर दिली तरी मी बाळासाहेंच्या विचारावर आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर चालणारा शिवसैनिक आहे आणि राहणार.' प्रताप सरनाईक यांची का होत आहे चौकशी? मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीकडून सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि कंपनीत मोठ्या पदावर असलेले अमित चंडोळे यांना ईडीनं दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं. अमित चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. प्रताप सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात व्यवसायासाठी आले. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. विहंग ग्रूप ऑफ कंपनीला मोठा फायदा होत गेला. अमित चंडोळे सध्या या कंपनीच्या डायरेक्टरपदावर आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. टॉप सिक्युरीटी आणि विहंग ग्रुप ॲाफ कंपनी यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे अमित चंडोळे आहे असं सांगितलं जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pratap sarnaik, Shivsena

पुढील बातम्या