मुंबई, 05 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेमध्ये टीका करणाऱ्या भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत शिवसैनिकांनी भाजप आमदार आशिष शेलार यांचे वादग्रस्तं होर्डिंग भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावलेत. तसेच भाजप नेते राज पुरोहीत यांच्या कार्यालयासमोरही आशिष शेलार यांचे होर्डिंग लावण्यात आलेत. मंगळवारीही आशिष शेलार यांची बुद्धी गुडघ्यामध्ये आहे, अशी टीका करत त्यांच्याविरोधात मंगळवारी डोंबिवलीत शिवसेनेतर्फे 'जोडेमारो' आंदोलन करण्यात आले होते.
तर आज शिवसेनेकडून आशिष शेलार यांचे वादग्रस्त होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आलेत. तसेच "आ'शिषे' मे देख" अशी वाक्य लिहण्यात आली आहेत. आशिष शेलार यांनी नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मंबईत अनेक ठिकाणी आशिष शेलार यांच्या विरोधात निदर्शने केली आणि होर्डिंगही लावलेत. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रस्त्यांवरही दिसू लागला आहे.
'नागरिकत्व कायदा लागू महाराष्ट्रात होणार नाही' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांची जीभ घसरली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि सेनेवर एकेरी तसेच असंसदीय भाषेत टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याचा जोरदार निषेध केला आहे. आशिष शेलार यांच्या फोटोला जोडे मारण्यासह त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आशिष शेलार हे महाराष्ट्रात जिथे जिथे जातील तिकडे त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा भाऊसाहेब चौधरी यांनी मंगळवारी दिला होता. त्याचप्रमाणे त्यांची बुद्धी गुडघ्यामध्ये आहे, असेही भाऊसाहेब चौधरी यांनी म्हटले होते.
भाजपच्या 'शेलार मामां'ना वक्तव्य पडलं महाग
दरम्यान, भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार हे कायम शिवसेनेला आणि इतर भाजप विरोधी पक्षांना ट्विटर सोशल मीडियातून अंगावर घेताना दिसून येतात. आशिष शेलार यांचे मार्मिक भाषेतले TWEET कायम प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतोच. त्याच वेळी त्यांच्या ट्वीट्समधून ते विरोधकांची खिल्ली उडवत असतात. शेलार यांचे ट्विट सर्वाधिक सलते ते शिवसैनिकांना. शेलार यांनी 2014 च्या युती सरकारमध्ये शिवसेना सोबत असूनही कायम ट्विटरवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांसह अनेक शिवसैनिकांवर सडेतोड टीका करत अंगावर घेतलं होतं. अशिष शेलार यांचे एक वक्तव्य यावेळी त्यांच्याच अंगलट आलं आहे.
'CAA आणि NRC कायदा लागू कसा करत नाही तुमच्या बापाचं राज्य आहे का'
शेलार यांनी एका जाहीर सभेत बोलताना 'CAA आणि NRC कायदा लागू कसा करत नाही तुमच्या बापाचं राज्य आहे का', अशा आशयाचं वक्तव्य करत मुख्यमंत्री ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं झालं उलटंच. शेलार यांच्या या विधानामुळे भाजपचीच मोठी राजकीय कोंडी झाली. उद्धव ठाकरे यांचा बाप काढल्यानं सोशल मीडियावर संताप उमटला. शेलार यांनाच मोठ्या टिकेचा सामना करावा लागला. इतकी वर्षं शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कायम टीका करणारे आता महाविकास आघाडीच्या सरकारच्या निमित्ताने एकत्र आलेले राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे अस्लम शेख या सर्वच नेत्यांनी ठाकरे यांचे जोरदार समर्थन करत शेलार यांच्यावर ही टीकेची संधी सोडली नाही.
शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांच्या विरोधात बेधडक टीका करतात. आज शेलार यांची राजकीय कोंडी होत असल्याचे पाहत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख सर्व नेत्यांनी शेलार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलं. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमात शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागल्यानंतर अखेर शेलार यांना दोन पावलं मागे जात माफी मागावी लागली.
आमचा बाप याच मातीतला आहे. आम्हाला सोडायला गुजरातला जावं लागत नाही.'
अशिष शेलार हे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत चारोळ्या स्वरूपात ट्वीट करत अनेक राजकीय नेत्यांवर तोंडसुख घेत होते. तसंच गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. यामुळेच शिवसेनेने बरोबरच जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांनी सोशल मीडिया वरून ट्विटरवरून आव्हाड यांना आव्हान देत 'आमचा बाप याच मातीतला आहे. आम्हाला सोडायला गुजरातला जावं लागत नाही.' अशी खोचक टीका केली शेलार यांच्या ट्विटरची कायम चर्चा आणि धसका विरोधकांना घ्यावा लागतो आज मात्र शेलार यांचीच राजकीय कोंडी होताना दिसली यामुळे शेलार यांचा आज 'मामा' केला अशीच राजकीय वर्तुळात चर्चा होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, BJP, Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra, Mumbai, Sharad pawar