मुंबई, 22 जानेवारी : मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,' अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
'मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही 2013 मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. 27 जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,' अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
'नाईट लाईफ नाही...ही तर किलींग लाईफ'
'ही नाईट लाईफ नसून किलींग लाईफ आहे. कमला मिल येथे आग लागली त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाईट लाईफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?' असा सवाल करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
'मोठ्या भ्रष्टाचाराची सुरूवात नाईट लाईफ माध्यमातून होईल. कमला मिल आग लागली होती. अतिरिक्त एफएसआय घोटाळा झाला. हा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी नाईट लाईफचा निर्णय घेऊन टुरिझमच्या नावाखाली पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी महापालिका आणि सरकार करत आहे,' असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
कशी असेल मुंबईची नाईट लाईफ?
- नाईट लाईफ शहर उपनगंरामध्येही लागू राहणार
- फूड ट्रक, खाऊ गल्ली, दुकान, हॉटेल, मॉल उघडे राहणार
- पहिला टप्पा 27 जानेवारी पासून सुरू होणार
- पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.