सगळीकडे सत्ता पण कारभार बेपत्ता,उद्धव ठाकरेंचा घणाघात

सगळीकडे सत्ता पण कारभार बेपत्ता,उद्धव ठाकरेंचा घणाघात

हिंदुत्त्वाची व्याख्या काय आहे ?, गोमांसाबद्दल भाजपची भूमिका काय ? मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का ?, नोटबंदीमुळे लोकांचे हाल झाले, नुकसान झालं मग ही देशद्रोही नाही का ? असे सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला झोड-झोडले

  • Share this:

30 एप्रिल :  तुमची सगळीकडे सत्ता आहे पण कारभार बेपत्ता आहे. हिंदुत्त्वाची व्याख्या काय आहे ?, गोमांसाबद्दल भाजपची भूमिका काय ? मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का ?, नोटबंदीमुळे लोकांचे हाल झाले, नुकसान झालं मग ही देशद्रोही नाही का ? असे सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला झोड-झोडले. साथ द्यायची उघडपणे आणि लाथ घालायची ती पण उघडपणे, मग आमचं काय चुकलं ? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सत्तेत भाजपवर अकुंश ठेवण्यासाठी आहोत असं स्पष्ट केलं.

शिवाजीपार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जीएसटी, नोटबंदी, गोमांस, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर सडकून टीका केली.  तर दुसरीकडे नारायण राणे यांचा दखल न घेता अनुलेखाने मारले.

बुलेट ट्रेनचा नागोबा कशाला ?

एलफिन्स्टन दुर्घटना घडली. नाहक निष्पाप 23 जणांचा बळी गेलाय. ज्या पुलावर दुर्घटना घडली त्या पुलाची रूंदी वाढवण्यासाठी सेनेच्या खासदारांनी सुरेश प्रभूंकडे मागणी केली होती. पण त्यांचं पुढे काय झालं तर निधी मिळाला पण काम तसेच अडून पडले. नेहमी अशी दुर्घटना झाली की उच्चस्तरीय समिती नेमायची हेच होत आलंय. पण ठोस असं काहीही झालेले नाही.

इथं लोकलच्या सोयीसुविधा नसताना बुलेटचा नागोबा आमच्या डोक्यावर कशाला ठेवता ?, मोदींचं स्वप्न मुंबईकरांच्या खांद्यावर का ठेवले जात आहे. बरं नेमकं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का ?, जर बुलेट करायची असेल तर कन्याकुमारी ते काश्मीर करा असा सल्लावजा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

नोटबंदीत हाल झाले मग हा देशद्रोह नाही का ?

काळा पैसा थांबवण्यासाठी नोटबंदी केली. पण त्यातून काय साध्य झालं. तर काहीही नाही. देशभरात लोकं रांगेत उभी होती, अनेकांचे जीव गेले. नोटबंदीमुळे लोकांचं नुकसान झालं मग हा देशद्रोही नाही का ? बंर हे होत नाही तेच जीएसटी लागू केलं. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय  मग हा सगळा खटाटोप कशाला केला. लोकांनी तुम्हाला विकासाची काम करण्यासाठी निवडून दिलं मग त्यांनाच खड्यात टाकण्याचे काम कशाला करताय ?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

"गाईला जपायचंय आणि ताईला झोडायचंय हे खपवून घेणार नाही"

जेएनयू विद्यापीठात बोलणारे देशद्रोही ठरतात. मग मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काय घोडं मारलं ? दोन महिन्यांपासून घोळ करून ठेवला. जे निकाल लागले ते अर्धवट लागले. बरं हे झालं मुंबई विद्यापीठाचं पण त्या लखनऊ विद्यापीठात काय झालंय. तर न्याय मागण्यासाठी गेलेल्या मुलींवर हात उचलला गेला. गाईला जपायचंय आणि ताईला झोडायचंय हे असलं हिंदुत्व खपवून घेणार नाही. आम्ही असला कोणताही हिंदुत्त्वात केला नव्हता असा घणाघात  उद्धव ठाकरेंनी केला.

भाजपची हिंदुत्वाची व्याख्या काय ?

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत युती केली. पण आज हिंदुत्त्वाच्या मुद्यावर खुलेआम गुंडगिरी सुरू आहे. गायी संदर्भात भाजपचे धोरण एकदम धरसोड स्वरुपाचे आहे. प्रत्येक राज्यात वेगळे धोरण आहे. सगळीकडे चिखल केला आहे. मळ दिसतोय कमळ दिसत नाही,

शिवसेनेचे हिंदुत्व देशहितासाठी आहे. आम्हाला देशद्रोह्यांना बडवणारे हिंदुत्व हवे आहे. फक्त मंदिरात घंटा बडवणारे हिंदुत्त्व आम्हाला नकोय. भाजपचे हिंदुत्व कोणते ? भाजपची गोमांसाबद्दल व्याख्या काय ? असा सवालच उद्धव ठाकरेंनी उपस्थितीत केलाय.

'रोहिंग्याच काय बांगलादेशीही नको'

मोहन भागवत आज योग्य बोलले. रोहिंग्या मुस्लिम देशासाठी धोकादायक आहे. त्यांच्या विधानाशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. रोहिंग्यांना लाथ मारून देशाबाहेर हकलून लावले पाहिजे. पण आपल्याकडे मानवतावादाचे डबके झाले आहे आणि अशीच डबकी कोर्टात धाव घेताय. आम्हाला रोहिंग्यच काय बांगलादेशी सुद्धा नको अशी सेनेची ठाम भूमिका आहे असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

'पवारासारखं लपूनछपून नाही, जे आहे ते उघडपणे'

पवारसाहेब, तुमच्यासारखं लपूनछपून काम करत नाही, जे काही आहे ते बेधडकपणे साथ देतो. तुमच्या सारखे अदृश्य हात नाहीये.

साथ द्यायची उघडपणे आणि लाथ घालायची तीपण उघडपणे, मग आमचं काय चुकलं ?, आम्ही उघडपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, काय करायचं ते करून घ्या असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला.

'सोशलमीडिया तुमच्यावर उलटलाय'

सोशलमीडियाच्या बळावर तुम्ही निवडून आला आहात, आज तुमच्यावरच सोशलमीडिया पलटलंय. मुळात सोशल मीडियावर बोलणाऱ्यांना तुम्ही नोटीसा पाठवताय ते काय रोहिंग्या आहे का ?. सोशल मीडियावर जेवढे चिरडणार तेवढे पेटून उठणार हे लक्षात ठेवा असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलाय.

'सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागणार नाही'

लाटेत वाहत जातो त्याला ओडका म्हणतात, आणि जो पोहून जातो त्याला वीर सावरकर म्हणतात अशीच आमची भूमिका आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेण्यासाठी मला मुहूर्त लागणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 09:19 PM IST

ताज्या बातम्या