शिवसेनेला घरचा आहेर.. या नेत्याने केला घणाघाती आरोप

शिवसेनेला घरचा आहेर.. या नेत्याने केला घणाघाती आरोप

बिल्डर आणि श्रीमंत थकबाकी दारांची पाठराखण केली जात असल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण,21 नोव्हेंबर: एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या (केडीएमसी) स्थायी समितीच्या आढावा बैठकीत कर थकबाकी दारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला असताना दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी स्थायी समिती सभेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बिल्डर आणि श्रीमंत थकबाकी दारांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप वामन म्हात्रे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाल्याने यात सुधारणा कशी केली जाईल. यासाठी केडीएमसीच्या स्थायी समितीने एक आढावा बैठकीचे आयोजन केले होते. केडीएमसीची आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार याबाबत काही निर्णय घेतले गेले. यावर्षी 470 कोटी विविध कर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. आत्तापर्यंत 173 कोटी वसुली झाली आहे. महापालिका क्षेत्रात ज्या लोकांनी कर थकबाकी ठेवली आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. टॉप 100 थकबाकी दारांची नावे वृत्तपत्रात घोषित करण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला. एवढेच नाही तर ज्या लोकांचे चेक बाउंस झाले आहेत. त्या लोकांवर फौजदारी गुन्हा सुद्धा केडीएमसी दाखल करणार आहे. याची माहिती केडीएमसीचे स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिली आहे. मात्र, स्थायी समितीच्या कामकाज आणि निर्णयावर स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवक वामन म्हात्रे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. महापालिकेचे 100 नाही तर 1836 थकबाकीदार आहेत. त्यात बडे बिल्डर, वास्तूविशारद आणि श्रीमंत लोक आहेत. यांच्याकडून थकबाकी वसुली केली जात नाही. फक्त सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो.

वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, या संदर्भात त्यांनी समितीच्या बैठकी दरम्यान मागणी केली आहे. जोपर्यंत श्रीमंत थकबाकी दारांकडून करवसुली केली जात नाही कोणत्याही सर्व सामान्य जनतेने कर भरू नये. या प्रकरणावर केडीएमसीचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी शिवसेनेच्या अंतर्गत वाद रस्त्यावर आणल्याचा टोला लगावला आहे. तसेच सर्वांकडून सक्त कर वसुली केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. खरंच केडीएमसी पदाधिकार्‍यांना आणि अधिकाऱ्यांना केडीएमसीच्या आर्थिक परिस्थितीची सुधारणा हवी असेल तर प्रत्येक थकबाकी दाराकडून कर वसुली करणे जरुरीचे आहे असे जाणकारांचे मत आहे.

First published: November 21, 2019, 9:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading