मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक.. भाजपला दिला 'हा' इशारा

मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 02:45 PM IST

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक.. भाजपला दिला 'हा' इशारा

उदय जाधव,(प्रतिनिधी)

मुंबई,26 ऑक्टोबर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. तासभराच्या चर्चेनंतर ही बैठक संपली. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आक्रमक दिसून आले. या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे 55 विजयी उमेदवार उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सत्तेचे समसमान वाटप असेल. त्यानंतरच सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना चर्चा करेल, असा आक्रमक पवित्रा सेना आमदारांनी घेतला आहे. शिवसेना आमदारांनी गटनेता आणि मुख्यमंत्रिपदासाठी सर्व अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे

अमित शाह-उद्धवजींची चर्चा त्यांनाच माहीत. आम्ही बोलणं योग्य नाही. दोन्ही नेते एकत्र बसून योग्य त्या पद्धतीने विषय संपवतील. त्यांनी म्हणणं मांडलं पण ते दबाव टाकतील असं नाही. राजकारणात लहान भाऊ, मोठा भाऊ संख्येवर ठरत असतो. ज्याची संख्या लहान तो छोटा आणि संख्या मोठी तो मोठा. आम्ही कुणाला लहान मोठा समजत नाही. सेना-भाजप समान आहोत. अधिकृतरित्या दोघेही बोलत नाहीत, तोपर्यंत आम्ही बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंनी दिली.

Loading...

'जायंट किलर' आमदारांचे विशेष कौतूक..

अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत पहिल्यांदा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या 'जायंट किलर' आमदारांचे मातोश्रीवर विशेष कौतूक करण्यात आले. त्यात यामीनी जाधव (भायखळा), दिलीप लांडे (चांदिवली) आणि महेश शिंदे (कोरेगाव) यांचा समावेश आहे. यामीनी जाधव आणि दिलीप लांडे यांनी मुस्लिम बहूल मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे तर महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सातारा कोरेगाव मतदारसंघात 4 वेळा आमदार राहिलेले शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे.

दरम्यान, आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही आमदार म्हणून विधिमंडळात उपस्थित असणार आहेत. तसेच त्यांनाच शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचीही गटनेतेपदी नियुक्ती होऊ शकते. आणि तसे झाले तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असतील. शिवसेनेच्या बैठकीत यासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख नव्या आमदारांसोबत काय निर्णय घेतायेत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप 'बॅकफूट'वर.. शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर

'अबकी बार 220 पार' हा निर्धार पूर्ण करू न शकल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. सत्तास्थापनेसाठी मदत करताना शिवसेनेकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. 2014 मध्ये भाजपने दुय्यम वागणूक दिल्याची खंत अजूनही शिवसेनेच्या मनात आहे. ती कसर भरून काढण्यासाठी शिवसेनेने आता लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करून दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर भाष्य करणे अनेकदा टाळले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची भाजपला आठवण करून दिली. त्याच प्रमाणे यावेळी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.

1995च्या सूत्रानुसार सत्तावाटप..

लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत विधानसभेला 1995 च्या सूत्रानुसार सत्तावाटप होईल, असे ठरल्याचे सेनेच्या सूत्रांनी सांगितले. तो शब्द आता भाजपने पाळावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेतून होत आहे. 2014 मध्ये मात्र फडणवीस यांनी शिवसेनेला ना उपमुख्यमंत्रिपद दिले ना गृहमंत्रिपद. जलसंपदा, बांधकाम, अर्थमंत्री खातीही भाजपकडेच होती. सेनेला पर्यावरण, परिवहन यासारखी दुय्यम खाती दिली. 1995 मध्ये राज्यात युती सरकार असताना धाकटा भाऊ असलेल्या भाजपला तेव्हा जी महत्त्वाची खाती दिली होती, तीच खाती आता 'धाकट्या'च्या रूपात असलेल्या शिवसेनेला हवी आहेत.

असे होते 1995 चे सूत्र

-1995 च्या निवडणुकीत शिवसेनेने 73 तर भाजपने 65 जागा जिंकल्या होत्या.

-मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर भाजपला उपमुख्यमंत्रिपद.

-दोन्ही पक्षांचे 14-14 कॅबिनेट मंत्री होते.

पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...