'जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात'

'जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात'

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका करणारे शाब्दिक ठाकरी बाण सोडले आहेत.

  • Share this:

उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई, 07 जानेवारी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका करणारे शाब्दिक ठाकरी बाण सोडले आहेत. मोदी सरकारने केलेल्या रोजगार निर्मितीचा दावा सीएमआयई या संस्थेच्या अहवालाने कसा खोटा ठरवला, त्याची आकडेवारीसह माहिती सामना अग्रलेखातून जाहीर करण्यात आली आहे.

ज्या हातांनी मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारला निवडूण दिलं. त्यांना मोदी सरकारची जुमलेबाजी आता लक्षात आली असून रोजगार निर्मितीचा ढोल फुटल्यामुळे आता देशातील बेरोजगारांचे हात मोदी सरकारचे तख्त फोडण्यासाठी शिवशिवत असल्याचं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

सामना अग्रलेख

'रोजगार निर्मितीच्या दाव्याचा मोदी सरकारचा ढोल ‘सीएमआयई’ या संस्थेच्या अहवालाने आता फोडला आहे. आपल्या देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे आणि वाढत्या लोकसंख्येने ती अधिक गंभीर केली आहे हे खरेच, पण त्या टोपीखाली मोदी सरकारला आपले अपयश झाकता येणार नाही. रोजगाराची ‘जुमलेबाजी’ करून सत्य तात्पुरते झाकता येईलही, पण देशातील बेरोजगार तरुणांची अशी थट्टा करू नका. गेल्या निवडणुकीत याच हातांनी मोठय़ा अपेक्षेने तुम्हाला बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात, हे कुणीही विसरू नये.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात दिलेल्या मुलाखतीत रोजगारनिर्मितीचे जे दावे केले होते ते फोल ठरविणारी माहिती आता समोर आली आहे. पंतप्रधानांनी त्या मुलाखतीत संघटित क्षेत्रात सात दशलक्ष रोजगार निर्माण झाले असे म्हटले होते. असंघटित क्षेत्रातही मोठी रोजगारनिर्मिती कशी झाली याचे दाखले त्यांनी दिले होते. मात्र आता ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालात पंतप्रधानांनी केलेल्या दाव्याच्या अगदी उलट माहिती समोर आली आहे.

‘सरत्या वर्षात देशातील एक कोटी नऊ लाख कामगारांना आपला रोजगार गमवावा लागला असून त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. नोकऱ्या गमावणाऱ्या महिलांची संख्या थोडीथोडकी नसून तब्बल 65 लाख एवढी आहे’ असे सीएमआयईच्या अहवालात म्हटले आहे. म्हणजे पंतप्रधान म्हणतात मोठी रोजगार निर्मिती केली व करीत आहे तर सीएमआयईचा अहवाल म्हणतो रोजगार निर्मिती सोडा, एक कोटी नऊ लाख कामगारांचा आहे तो रोजगार बुडाला. डिसेंबर महिन्यात 39 कोटी 70 लाख कामगारांची नोंद झाली. ती गेल्या वर्षाच्या तुलनेत एक कोटी नऊ लाखांनी कमी आहे. याचाच अर्थ वर्षभरात एवढय़ा लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान जर 70 लाख

रोजगार निर्माण केल्याचे श्रेय

घेत असतील तर मग त्यांना एक कोटी नऊ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.'

'मोदी नेहमीच त्यांच्या सरकारने केलेल्या रोजगार निर्मितीचे ढोल वाजवत असतात, प्रत्यक्षात मात्र हा ढोल दोन्ही बाजूंनी फुटलेला आहे हेच ‘सीएमआयई’च्या अहवालाने दाखवून दिले आहे.'

हेही वाचा - युतीचं 'भवितव्य' आज ठरणार? शिवसेनेनं बोलावली महत्त्वाची बैठक

'शहरी भागात तर बेरोजगारी आहेच, पण ग्रामीण भागातही गेल्या वर्षभरात 91 लाख नोकऱ्यांवर कुऱहाड कोसळली आहे. एकीकडे पंतप्रधान ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देतात, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, पण त्यांच्याच राज्यात 2018 या एका वर्षात ग्रामीण भागातील 65 लाख महिला नोकऱ्या गमावतात. शहरी भागात हाच आकडा 23 लाख एवढा होतो. हे रोजगारनिर्मितीचे लक्षण मानायचे की बेरोजगारवाढीचे?'

'एकीकडे पंतप्रधान प्रत्येक हाताला काम देण्याच्या आश्वासनाचा ‘फुगा’ सोडतात आणि दुसरीकडे त्यांचेच एक ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही अशी ‘टाचणी’ त्या फुग्याला लावतात. बरं, ही टाचणीदेखील नागपुरातील ‘युवा सशक्तीकरण’ या कार्यक्रमात तरुणांसमोरच लावली जाते. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील प्रत्येकाला नोकरी शक्य नाही असे सांगत

भजी तळण्याचा ‘रोजगार मंत्र’

सुशिक्षित बेरोजगारांना देतात.' 'रोजगाराची ‘जुमलेबाजी’ करून सत्य तात्पुरते झाकता येईलही, पण देशातील बेरोजगार तरुणांची अशी थट्टा करू नका. गेल्या निवडणुकीत याच हातांनी मोठय़ा अपेक्षेने तुम्हाला बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. आज तेच हात तुमच्या जुमलेबाजीविरोधात शिवशिवत आहेत. जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात, हे कुणीही विसरू नये.'

VIDEO : देवळाबाहेर दर्शन घेणारी महिला रिव्हर्स येणाऱ्या ट्रकखाली आली, मात्र...!

First published: January 7, 2019, 7:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading