मुंबई, 25 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai municipal Corporation election 2022) जशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय पक्ष्यांची एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षाला प्रकल्प पूर्ण करून उद्घाटन करण्याची घाई लागली आहे. तर विरोधी बाकावर बसलेल्यांना महापालिकेच्या उधळपट्टीवर अंकुश लावायचा आहे. अशातच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा (Shivaji Park) रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पावरून (Rainwater Harvesting Project) शिवसेना (Shivsena) आणि मनसेमध्ये (MNS) जुंपली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकल्पात पुढाकार घेतल्याने महापालिकेचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रकल्पा वरून गदारोळ माजला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागवली आहे. तर राज ठाकरे यांनी मात्र दोन दिवसांपूर्वीच महापालिकेला पत्र लिहून हे काम सीएसआर फंडातून करण्याची परवानगी मागितली आहे. मनसेने पाठवलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी टीका केलेली आहे.
'संदीप देशपांडे नगरसेवक असताना हा प्रकल्प सीएसआर मधून का राबवला गेला नाही, शिवाय चार वर्ष मेहनत केल्यानंतर आम्ही हा प्रकल्प राबवत असताना मनसेला त्याचं क्रेडिट घ्यायचा आहे म्हणून अशा पद्धतीचे पत्र दिले आहे' अशी टीका राऊत यांनी केली आहे.
तर विशाखा राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'हा प्रकल्प मनसेने सीएसआर फंड आतूनच राबवला होता. पण शिवसेनेच्या तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी तो खराब केला. त्यानंतर चे काम हे महापालिका फंडातून करण्यात आले. आताही शिवसेनेला या प्रकल्पातून मिळणारा आर्थिक फायदा हातातून जाईल अशी भीती वाटते आहे. त्यामुळे शिवसेनेला आर्थिक फायदा कसा होईल. याचीही तजवीज आम्ही करू शकतो, असा चिमटा संदीप देशपांडे यांनी काढला आहे.
शिवाजी पार्क हा शिवसेना आणि मनसे दोन्हीसाठी ही महत्त्वाचा विषय असल्याने ते प्रकरण पेट घेणार आहे. त्यातच संदीप देशपांडे यांनी 8 मार्चला हे टेंडर कोणत्या कंत्राटदाराला मिळेल हे मी आधीच सांगणार आहे, असं म्हणत या प्रकरणाला आणखीच हवा दिली आहे.
काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प?
शिवाजी पार्कवर उभारल्या जाणाऱ्या या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पावर चार कोटी रुपये खर्च होणार आहेत. सध्या दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प केला जाणार आहे. शिवाजी पार्कच्या भोवती 35 रिंग वेल खोदल्या जाणार आहे. जमिनीखाली गोड पाण्याचे झरे शोधून त्या अंतरावर या रिंग वेल खोदल्या जाणार आहेत. रिंग वेल मधून पाईप टाकून त्याला स्प्रिंकलर जोडून पाण्याची फवारणी केली जाईल. पावसाळ्यात जमिनीत मुरणारे पाणी पुन्हा रिंग वेलमध्ये साठवण्यासाठी अशाच पद्धतीने पाईपचं जाळ उभारले जाईल.
VIDEO : महिलेसबोत अरेरावी आणि राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसैनिकांकडून मारहाण
शिवाजी पार्क परिसरात 8 पिच असून आसपासच्या भागात खोलगट खड्डे झाल्याने पाणी साचते. त्यामुळे जमिनीचे पातळी एकसारखी करून उरलेल्या जागी लॉन केलं जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Shivaji park, Shivsena