कोरोना काळात परीक्षेवरून वादंग, आदित्य ठाकरेंनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र

कोरोना काळात परीक्षेवरून वादंग, आदित्य ठाकरेंनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र

प्रवेश परीक्षेंच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने जोरदार विरोध होत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : देशात कोरोना व्हायरसचा धोका कायम असताना प्रवेश परीक्षेंच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने जोरदार विरोध होत आहे. भाजपशिवाय इतर राजकीय पक्षांचा या परीक्षांना विरोध आहे. तसंच विद्यार्थी आणि पालकांमध्येही कोरोना काळात परीक्षा घेण्याबाबत नकारात्मक सूर आहे. अशातच आता युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या परीक्षा रद्द करण्यासाठी आपण लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे.

'विविध पदवी आणि प्रवेश परीक्षांमुळे विद्यार्थी आणि पालकांना धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत लक्ष वेधण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे,' अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.

'बहुतेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना परीक्षा घेणं हा पर्याय योग्य नाही. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या पालकांसोबत, आजी-आजोबांसोबत राहात असतात. त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतं,' असं आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कधी होणार आहे प्रवेश परीक्षा?

JEE आणि NEEची परीक्षा होणार की नाही या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेत होणार असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण नीट आणि जेईई परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. यासंदर्भात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं परीपत्रक जारी केलं आहे.

जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. नीट परीक्षेसाठी 15,97,433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात 11 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती.

Published by: Akshay Shitole
First published: August 24, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या