शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाबद्दल सेना आमदारच उदासीन

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाबद्दल सेना आमदारच उदासीन

  • Share this:

उदय जाधव,महेंद्र मोरे, मुंबई  

 सिद्धार्थ गोदाम, बीड

12 मे : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता यावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 40 आमदारांना मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी शिवसंपर्क अभियानाला जाण्याचे आदेश दिले. पण 40 पैकी 27 आमदार तिथे पोहोचलेच नाहीत. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे यांनी कानउघाडणी केल्यानंतरही दांडीबहाद्दर आमदारांना काहीच फरक पडलेला नाही. या कामचुकार आमदारांना शुक्रवारी शिवसेना भवनामध्ये येण्याचे फर्मान ठाकरे यांनी सोडले असून आता त्यांचे धाबे दणाणले आहेत.

दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवेंनी जे तारे तोडले ते आपल्यासमोर आहेत. पण याचा अर्थ असा नाही की इतर पक्षाचे नेतेही शेतकऱ्यांसाठी फार काही करतायत. मराठवाड्यातील प्रश्न जाणून ते विधानसभेत मांडता यावेत यासाठी  उद्धव ठाकरेंनी  शिवसंपर्क यात्रेची घोषणा केली.  त्यासाठी ४० आमदारांची निवडही करण्यात आली.  या आमदारांच्या मदतीसाठी मुंबई-ठाण्यातील आजी-माजी नगरसेवक आणि संबंधित जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखांनाही तिथे जाण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र या यात्रेसाठी 40 पैकी 27 आमदार शिवसंपर्क यात्रेत फिरकलेच नाहीत. ना ते कुठल्या गावात गेले ना ते एखाद्या शेतकऱ्याला भेटले.

विरोधकांनी 'संघर्ष यात्रा' काढली पण ती तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरली. त्यानंतर सरकारची 'संवाद यात्रा' आली तर दानवेंची शिवीगाळ दिसली. शिवसेनेचे आमदार नेते 'शिवसंपर्क यात्रे'ला तर फिरकलेच नाहीत. बरं शिवसेनेच्या यात्रेत मुंबईतल्या नगरसेवकांनाही पाठवलं होतं. त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न फार काही या नेत्यांना कळत होतं असं दिसलं नाही.

दुष्काळग्रस्त भागाचा दौरा झाल्यानंतर विधानसभेत आमदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला अडचणीत आणण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती. मात्र शिवसंपर्क अभियानांतर्गत पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील दौऱ्याला ४० पैकी तब्बल 27 आमदारांनी अनुपस्थिती लावून उद्धव ठाकरे यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे.

मराठवाड्यात शिवसेनेचे 40 आमदार असले तरीसुद्धा जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि नंतर आलेल्या पालिकांमध्ये फारसं काही यश मिळवू शकले नाहीत. त्याचं कारणही शिवसेनेच्या मंत्री, आमदारांनी प्रचारातून घेतलेला काढता पाय हेच होतं. त्यात ना उद्धव ग्रामीण भागात फिरले ना त्यांचे मंत्री. अशीच स्थिती राहीली तर शिवसेनेसोबतचा लोकच संवाद तोडायला मागं पुढं पहाणार नाहीत.

First Published: May 12, 2017 01:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading