शिवसेनेला काँग्रेसशी आघाडी केल्याची मोठी किंमत मोजावी लागेल- नितीन गडकरी

शिवसेनेला काँग्रेसशी आघाडी केल्याची मोठी किंमत मोजावी लागेल- नितीन गडकरी

महाराष्ट्रात सत्तेत आलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही

  • Share this:

रांची,5 डिसेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रात सत्तेत आलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असाही दावा नितीन गडकरी यांनी यावेळी केला आहे. तसेच पुढील काही दिवसांतच शिवसेनेला काँग्रेसशी केलेल्या आघाडीची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला आहे.

नितीन गडकरी यांनी 'न्यूज 18'शी यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती करायची आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत जायचे, ही बाब सैद्धांतिकदृष्ट्या योग्य नाही. तसेच ती लोकशाहीसाठीही मारक ठरणारी आहे.

संधीसाधू आघाडी..

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात मते मागितली होती. त्यामुळे जनतेने शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला कौल दिला होता. तसेच जनतेने निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले होते. तरीही केवळ मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली. शिवसेनेची ही भूमिका हे जनतेला रुचणार नाही. तसेच शिवसेना कायम बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या हिंदुत्वाचा दाखला देत असते ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसच्या युतीला सैद्धांतिक आधार नाही, ही संधीसाधू आघाडी आहे. शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप गडकरी यांनी केला आहे. तरीही शिवसेनेने या दोन्ही पक्षांशी युती केली. शिवसेनेला याची किंमत मोजावीच लागेल,असा इशारा गडकरी यांनी दिला. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

'हा' मोठा फरक..

महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीत मोठा फरक आहे. तिथले पक्ष वेगळे आहेत. अजेंडा वेगळा आहे. निवडणुकीतील मुद्देही वेगळे आहेत. येथील जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे रघुवर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नक्की विजय मिळेल, असेही गडकरी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या