IFSC वरून 'सामना' पेटला, शिवसेनेनं सुनावले फडणवीसांना खडेबोल

IFSC वरून 'सामना' पेटला, शिवसेनेनं सुनावले फडणवीसांना खडेबोल

'फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू धरून बोलत असतील तर हा असला विरोधी पक्ष कुचकामी आहे'

  • Share this:

मुंबई, 04 मे : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलवण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि महाविकासआघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. याच मुद्दाला हात घालत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

'महाराष्ट्रावरील अन्यायाचे समर्थन कसले करता?' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका करण्यात आली आहे. 'गांधीनगरला हलविण्यात आलेल्या आर्थिक केंद्राबाबत तांत्रिकदृष्टय़ा गुजरातचे बरोबर असेलही, पण दिल्लीत मोदी सरकार असल्यामुळेच गुजरातला झुकते माप मिळत आहे. मुंबईतल्या अनेक वित्तीय संस्था, उद्योग-व्यापार गुजरातला हलवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान केलेच आहे. विरोधी पक्षात असताना शिवसेनेने यावर आवाज उठवला. आता हे काम  फडणवीस व त्यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने केले पाहिजे. फडणवीस हे महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू धरून बोलत असतील तर हा असला विरोधी पक्ष कुचकामी आहे, महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना जनताच मुंबईच्या अरबी समुद्रात बुडवेल, अशी टीका सेनेनं केली आहे.

हेही वाचा - सरकार देऊ शकत नाही, तर काँग्रेस मजुरांना रेल्वे तिकीटं काढून देणार -सोनिया गांधी

केंद्रात गुजरातला झुकते माप देणारे सरकार आहे आणि त्यातून मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गांधीनगर येथे गेले अशी भावना लोकांमध्ये आहे. हे वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गांधीनगरला कसे गेले यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते निरर्थक आहेत. देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आता एकमेकांवर जे आरोप करीत आहेत त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार? महाराष्ट्राच्या न्याय हक्काचा आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरील मुंबईच्या नैसर्गिक अधिकाराचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यासाठी लढण्याची जबाबदारी फक्त राज्य सरकारची म्हणता येणार नाही. किंबहुना अशा वेळी विरोधी पक्षाने सह्याद्रीची डरकाळी फोडायची असते. संयुक्त महाराष्ट्राचा मुंबईसाठीचा लढा विरोधी पक्षच लढला व जिंकला, हा इतिहास अमर आहे, अशी आठवणही सेनेनं करून दिली.

'फडणवीसांकडून वकिली क्लेशदायक'

मुंबई हेच देशाच्या अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र आहे. रिझर्व्ह बँक, स्टॉक एक्सचेंज, विमा कंपन्यांपासून सर्व आर्थिक संस्था मुंबईतच आहेत. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय केंद्र मुंबईतच व्हावे असे ठरले व तशी तयारी सुरू होती. देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आता एकमेकांवर जे आरोप करीत आहेत त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार? चव्हाण हे अनेक वर्षे केंद्रात होते व नंतर मुख्यमंत्री झाले. ते म्हणतात त्याप्रमाणे 2014 पर्यंत मुंबईतील वित्तीय केंद्राचा प्रस्ताव फक्त चर्चेच्या पातळीवर होता. या काळात महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांकडून वित्तीय केंद्रांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. मात्र 2014 साली केंद्रात भाजपची सत्ता आली. यानंतर 1 मे 2015 रोजी मोदी सरकारने मुंबई आणि बंगळूरूचा प्रस्ताव फेटाळून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन करण्याचे ठरवले, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस होते व त्यांनी मुंबईवरील अन्यायास विरोध केला नाही. आताही ते महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातचेच कसे बरोबर आहे याची वकिली करीत आहेत हे क्लेशदायक आहे, अशी टीकाही फडणवीसांवर करण्यात आली.

हेही वाचा -IFSC गुजरातला हलवण्याचा निर्णय धक्कादायक, शरद पवारांचं मोदींना पत्र

'भाजप हा कुचकामी पक्ष'

दुसरीकडे मुंबईत आर्थिक सेवा केंद्र होणार की नाही हा प्रश्न आता नाहीच, पण असे केंद्र निर्माण करण्यात मुंबई कशी कुचकामी ठरली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या काही उपटसुंभांकडून उपस्थित केले जात आहेत. ते चीड आणणारे आहेत. उद्या हे लोक असेही विचारतील की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय? 105 हुतात्मे मुंबईसाठी झाले हे चूक असून ते प्लेगने मरण पावले अशी मुक्ताफळेही ते उधळतील. अशी विधाने करणाऱ्यांना हुतात्मा स्मारकाच्या बाजूला खांब उभारून त्यास बांधून ठेवायला हवे. इतके निर्लज्ज लोकं महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्राशीच बेईमानी करतात हे कसे सहन करायचे?, असा संतप्त सवाल उपस्थितीत करत भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

'खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत फडणवीस यांनी जितक्या जोरबैठका काढल्या तितक्या महाराष्ट्रावरील या अन्यायाविरुद्ध काढल्या असत्या तर बरे झाले असते. खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे हे शिवरायांच्या धर्मास धरून नाही. लंडन शहरात तीन ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचे काम चालते. या धर्तीवर आपल्याकडेही मुंबई आणि अहमदाबादमध्ये वित्तीय केंद्रे सुरू होऊ शकतात, असा एक प्रस्ताव फडणवीस यांनी मांडला आहे. आता हा प्रस्ताव घेऊन त्यांनी पुन्हा राजभवनात जाऊ नये म्हणजे झाले.  मुळात याप्रश्नी महाराष्ट्रावर अन्याय झाला व केंद्र सरकारने पक्षपात केला हे त्यांना मान्य आहे काय? तसे त्यांना वाटत असेल तर महाराष्ट्रातील अन्यायाविरुद्ध एक प्रस्ताव त्यांनी येत्या विधानसभेत मांडायला हवा, असं आव्हान सेनेनं फडणवीसांना करण्यात आलं आहे.

'शरद पवारांची भूमिका रास्त'

'शरद पवार यांनीही आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच ठेवावे, ते गुजरातला नेण्याच्या निर्णयाचा केंद्र सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र देऊन केली आहे. ती रास्त आहे आणि हे केंद्र मुंबईबाहेर गेल्यास देशाचे आर्थिक नुकसान होईल असा त्यांनी दिलेला इशाराही योग्यच आहे. महाराष्ट्राच्या या प्रश्नावर राजकीय पक्षभेद बाजूला ठेवायला हवेत. महाराष्ट्र आधी, राजकीय पक्षांचे झेंडे नंतर. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले हे फक्त बोलायचे नाही तर कृतीने दाखवायला हवे', असंही या लेखात म्हटलं आहे.

'मराठी विरुद्ध गुजराती वाद नाही'

साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य होते. गुजराती व मराठी हे दोघे सदैव भाई-भाई म्हणूनच वावरले. गुजरातचा विकास मुंबईच्याच आर्थिक ताकदीने झाला. गुजरातची अर्थव्यवस्था आजही महाराष्ट्रातील गुजराती बांधवांच्या येथील उलाढालीवरच अवलंबून आहे. ‘व्हायब्रंट गुजरात’चा संदर्भ नेहमी दिला जातो. त्या व्हायब्रंट गुजरातचे स्वप्न साकार करण्यात मुंबईत बहरलेल्या गुजराती उद्योगपतींचाच हातभार आहे हे कोणाला विसरता येणार नाही. मोदी शहा या दोन नेत्यांचा उदय होण्यापूर्वी मुंबईतील गुजराती समाजाचा रक्षणकर्ता मराठी माणूस, पर्यायाने शिवसेनाच होती, यापुढेही राहील. त्यामुळे वित्तीय सेवा केंद्राचा वाद हा मराठी विरुद्ध गुजराती आहे या भ्रमात कोणी राहू नये, असंही सेनेनं स्पष्ट केलं.

 संपादन - सचिन साळवे

First published: May 4, 2020, 9:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या